राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या प्रयत्नांमुळे स्टाफची दिवाळी झाली गोड
निर्भीडसत्ता न्यूज –
गेल्या तीन वर्षांतील सर्वात मोठी म्हणजे तब्बल 14,200 रुपयांची थेट वेतनवाढ देत कासारवाडी, पिंपरी, पुणे येथील सिमण्ड्स मार्शल प्रा. लि. या कंपनीने कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांची दिवाळी गोड केली आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या प्रयत्नांतून कंपनीत हा ऐतिहासिक वेतनवाढ करार झाला असून ट्रेड युनियन कायद्याखाली कार्यालयीन कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी झालेला हा पहिलाच वेतनवाढ करार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तीन वर्षांपूर्वी सिमण्ड्स मार्शल कंपनीतील सर्व स्टाफ कर्मचारी व अधिकारी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सदस्य झाले होते. यावेळी स्टाफला वर्षाला केवळ पाचशे ते हजार रुपयांची वेतनवाढ मिळत होती. जी इतर कामगारांपेक्षा व त्यांच्या श्रमाच्या मानाने अत्यंत अल्प होती. या स्टाफमध्ये पदवीधर, अभियंता अशा उच्चशिक्षीत कर्मचा-यांचा समावेश आहे. त्यामुळे राष्ट्रीय श्रमिक अघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय श्रमिक अघाडीकडून कंपनीला 9 हजार वेतनवाढीचे पत्र देण्यात आले. त्यानुसार तीन वर्षांचा करार मंजूर करण्यात आला. या कराराची तीन वर्षाची मुदत संपताच एप्रिल 2017 पासून 14 हजार 200 रुपयांची वेतनवाढ करण्यात आली.
त्यामुळे राष्ट्रीय श्रमिक आघाडीने केलेल्या प्रयत्नामुळे सिमण्ड्स मार्शल कंपनीच्या स्टाफला तीन वर्षांत एकूण 23 हजार रुपये एवढी थेट वेतनवाढ मिळाली आहे. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याव्यतिरिक्त KPI प्रमाणे दिलेले उद्दिष्ट साध्य केल्यास तीन हजार व प्रत्येक वर्षाला हजार रुपये वेतनवाढ देण्यात येणार आहे. तसेच मिळालेल्या थेट वेतनवाढीपैकी 50 टक्के हिस्सा मूळ वेतनात देण्यात आलेला असून उर्वरीत 50 टक्के भाग हा चार हप्त्यांमध्ये विभागून देण्यात येणार आहे. या कराराचा लाभ कंपनीतील सुमारे शंभर कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांना मिळणार आहे.
दिवाळीच्या दिवसातच मिळालेल्या या गोड बातमीचा कंपनी स्टाफने फटाके वाजवून व राष्ट्रीय श्रमिक अघाडीच्या फलकाला हार घालून आनंद साजरा केला. तसेच स्टाफ च्या वतीने राष्ट्रीय श्रमिक अघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांचाही सत्कार करण्यात आला.
या करारावर सिमण्ड्स मार्शल कंपनीच्या व्यवस्थापनातर्फे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.जी.पाटील, पी.आर.राजज्ञ, एन.एस. मेठकर, पी.व्ही. थंपी, ए. आर. अनिखिंडी, पी. पी. काळे यांनी तर स्टाफ युनियनच्या वतीने यशवंत भोसले, एस.एम. गवस, ए. बी. सोनोणे, एम. एच. बापट, एस. बी. वाळके, आर. ए. साळवी, एम. डी. जोशी या पदाधिका-यांनी सह्या केल्या.