निर्भीडसत्ता न्यूज –
थेरगाव ते चिंचवडदरम्यान उड्डाणपूल उभारण्यासाठी २८ कोटी आणि च-होलीतील संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम समूहशिल्पासाठी ९ कोटी रुपयांचा खर्च स्थायी समितीने मंजूर केला आहे. यासंह विविध प्रकारच्या कामांसाठी सुमारे ४१ कोटी ८० लाख ४१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
स्थायी समिती सभागृहात आज (सोमवारी) झालेल्यासभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. प्रसुमधाम सोसायटी शेजारील १८ मिटर रस्त्यावर थेरगाव ते चिंचवड दरम्यान उभारण्यात येणा- या मुख्य पुलाची लांबी ११० मिटर असून रुंदी २४.८० मिटर इतकी आहे. यामध्ये ८ मिटर रुंदीच्या दोन मार्गीका, १ मिटर रुंदीचा दुभाजक असणार आहे. मार्गीकेच्या दोन्ही बाजूला दोन मिटर रूंदीचे पादचारी मार्ग व त्यास जोडून दोन मिटर रुंदीची व्हीविंग गॅलरी व पुलास दोन्ही बाजूने जोड रस्ते करण्यात येणार आहेत.
पुणे-आळंदी रस्त्यालगत स.नं.७८ च-होली येथील संत नामदेव व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीवर आधारीत उभारण्यात येणा-या समुह शिल्पाच्या परिसरातील स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ९ कोटी २६ लाख ६५ हजार रुपयांच्या खर्चासही स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. भोसरी पी.एस. २ पंप हाऊस येथे जुन्या तीनही पंपाचे आयुर्मान संपलेले असल्याने तेथील एक जुना पंप काढून त्याजागी नविन सब मर्सिबल पंप बसविण्यासाठी येणा-या सुमारे ३० लाख ४३ हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.