निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील सापांसाठीच्या उंदीर खरेदीत भ्रष्ट्राचाराचा आरोप झाल्यानंततर कोणताही भ्रष्ट्राचार झाला नसल्याचा खुलासा महापालिकेने केला. पशुवैद्यकीय विभागाकडून ही खरेदी वाजवी दराने होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्राणी संग्रहालयातील सापांसाठी खाद्य म्हणून पालिकेतर्फे उंदीरांची खरेदी केली जाते. शहरातील हाफकिन ही संस्था एक उंदीर ७५ पैशात देण्यासाठी तयार असताना जी. बी. एन्टरप्रायझेस या खासगी संस्थेकडून तब्बल १३८ रुपयांला एक उंदीर खरेदी केला जातो. यामध्ये लाखो रुपयांचा घोटाळा होत असून त्याच्या चौकशीची मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली होती. त्यानंतर पालिकेने तातडीने खुलासा करत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे.
खुलासामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश गोरे यांनी म्हटले आहे की, ए. ए. कंपनीकडून टाकाऊ उंदीर दीड रुपया दराने घेतले जात होते. मात्र, अधिक उंदरांची गरज असल्याने निविदा प्रक्रिया राबवून मे. जी. बी. एंटरप्रायजेस यांच्याकडून १३८ रुपये प्रति उंदीर घेतले जातात. त्यांच्याकडून नियमित चांगल्या प्रतीचे उंदीर पुरवठा केले जात आहे. स्थानिक दुकानदारांकडे उपलब्ध उंदीर दरापेक्षा पालिकेने स्विकारलेले दर वाजवी आहेत. प्रयोग शाळांमध्ये प्रयोगांसाठी आवश्यक उंदरांचा पुरवठा करणारे उत्पादक प्रयोगशाळेला किमान रु. १३५-१७० प्रति उंदीर + प्रवास खर्च या दराने पुरवठा करतात. महापालिकेने स्विकारलेले दर यापेक्षा कमी आहेत. पुणे परिसरात कोणतीही शासकीय संस्था उंदीर विक्री करत नाही. तथापि, विविध शासकीय संस्थांकडून उंदीर खरेदी दर मागविणेसाठी यापुर्वी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यांचेकडून अद्याप उत्तर प्राप्त झालेले नाही. उंदीर खरेदीसाठी शासनमान्य दर मिळविणेसाठी पाठपुरावा करण्यात येईल.