निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सुरू होणा-या मेडिकल कॉलेजचा नगरविकास खात्याचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी गुरुवारी (दि. ९) मुंबईत झालेल्या बैठकीत आढावा घेतला. काही अडथळे असल्यास ते तातडीने सोडविण्याची ग्वाही देखील मंत्री डॉ. रणजित पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिली आहे.
मुंबईत मंत्रालयात झालेल्या या बैठकीत मंत्री पाटील यांनी कॉलेज सुरू करण्याच्या प्रक्रियेची माहिती पालिकेच्या अधिका-यांकडून घेतली. प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे, याची माहिती अधिका-यांनी दिली. तसेच, मेडिकल कॉलेज लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्या बरोबर पदव्यूत्तर अभ्यासक्रमाबरोबर वायसीएममध्ये एमबीबीएसचा पदवी अभ्यासक्रम सुरू करता येईल का ? याबाबत सविस्तर अभ्यास करावा. त्याचा खर्चाचा व प्रक्रियेबाबत विचार करून तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या.
बैठकीला पिंपरी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, वायसीएम कॉलेजचे विशेष र्याधिकारी डॉ. पद्माकर पंडीत आदी उपस्थित होते.