निर्भीडसत्ता न्यूज –
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी आज (मंगळवारी) कार्ला येथील एकविरा मंदिराला भेट दिली. त्यांनी कळस चोरी प्रकरणी सुरू असलेल्या तपासासाठी ही भेट देऊ तपासाचा आढावा घेतला.
लोणावळ्यातील कार्ला येथील एकविरा देवीच्या मंदिरावरील सोन्याचा मुलामा असलेला पंचधातूचा कळस ३ ऑक्टोबर २०१७ रोजी चोरीला गेला होता. या घटनेला दीड महिना होत असताना पोलिसांना अजूनही चोरटे सापडलेले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर विश्वास नांगरे पाटील यांनी एकविरा मंदिर परिसराला भेट देऊन चालू असलेल्या तपासाची माहिती घेतली.
त्यांनी उपस्थित अप्पर पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते, विभागीय पोलीस उपअधिक्षक ज्ञानेश्वर शिवथरे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे दयानंद गावडे, सहायक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांना तपासाबाबत सुचना दिल्या.
३ ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भक्ताला हा प्रकार लक्षात आल्यानंतर हे चोरी प्रकरण समोर आले होते. त्यानंतर पोलिसांकडून तपास सुरू आहे.