निर्भीडसत्ता न्यूज –
नुकताच शेतात नुकसान झालेच्या रागातून एका वानराला दांडकाने मारणाऱ्या माथेफिरूंचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मुक्या प्राण्यांचा छळ करून त्यांचे हाल करणारी माणसे जशी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच माणुसकीच्या नात्याने प्राण्यांची काळजी घेऊन त्यांच्यावर कोसळलेल्या संकटातून सुटका करणारी माणसेही या जगात आहेत. अशीच घटना पिंपरी-चिंचवडमध्ये अनुभवायला मिळाली.
निगडी येथे असलेल्या स्मशानभूमीच्या लोखंडी प्रवेशद्वारामध्ये एका कुत्र्याचे डोके अडकून बसले. त्याने डोके सोडविण्याचे अनेक निष्फळ प्रयत्न केले पण त्यामध्ये तो यशस्वी झाला नाही. रात्री केंव्हातरी हा प्रकार घडल्याने त्याच्याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. या परिसरातील सचिन चिखले आणि इतर तरुणानी या श्वानांची सुखरूप सुटका केली.
कुत्र्याला कोणतीही इजा न होता हॅकसा ब्लेडच्या साहाय्याने सावधगिरीने दरवाजाचा लोखंडी तुकडा कापल्यानंतर या श्वानाची सहा तासानंतर सुटका झाली. सचिन चिखले यांनी कुत्र्याची सोडवणूक करून माणुसकीचे दर्शन घडविले. तब्बल सहा तासानंतर हा कुत्रा अक्षरशः मृत्यूच्या दारातून सुखरूपपणे परतला.