निर्भीडसत्ता न्यूज –
नाशिक फाटा ते वाकड या बीआरटीएस रस्त्यावर पिंपळेसौदागरमध्ये सिग्नल फ्री रस्ते करण्यासाठी स्वराज गार्डन चौक, गोविंद यशदा चौक, पी. के. चौक आणि शिवार चौकात ग्रेडसेपरेटर तयार करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
याबाबत नगरसेवक नाना काटे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, नाशिक फाटा ते वाकड दरम्यान नागरिकांसाठी जलद वाहतुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळात बीआरटीएस रस्ता तयार करण्यात आला. शहरातील हा महत्त्वाचा बीआरटीएस रस्ता पिंपळेसौदागर येथून जातो. या परिसरात नागरिकांच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी वाहतुकीचा ताण रस्त्यांवर विशेषत; चौकामध्ये येत आहे. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी सिग्नल बसवावे लागते.
पिंपळेसौदागर सिग्नल फ्री होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वराज गार्डन चौक, गोविंद यशदा चौक, पी. के. चौक, कोकणे चौक आणि शिवार चौक या ठिकाणी ग्रेड सेपरेटरची अत्यंत गरज आहे. यासंदर्भात आपण बीआरटीएस विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यानुसार गोविंद यशदा चौकात ग्रेड सेपरेटर उभारण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले असून, प्रत्यक्षात कामालाही सुरूवात होणार आहे. गोविंद यशदा चौकाच्या धर्तीवर स्वराज गार्डन चौक, पी. के. चौक, कोकणे चौक आणि शिवार चौकातही ग्रेड सेपरेटर उभारण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करून प्रत्यक्षात कामालाही लवकरात लवकर सुरूवात करावी, अशी मागणी नगरसेवक नाना काटे यांनी केली.