निर्भीड न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘स्थायी समिती’तील ‘टक्केवारी’ हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. या ‘टक्केवारी’वरून स्थायी समिती सदस्यांमध्ये सातत्याने खटके उडतात. असाच प्रकार बुधवार, दि. 20 एप्रिल रोजी घडला. काँग्रेसच्या एका नगरसेविकेच्या पतीने थेट स्थायी समिती सभापतींशी वाद करत टक्केवारीवरून गोंधळ घातला.
राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या चाव्याही राष्ट्रवादीकडे आहेत. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असून, शहरातील विविध विकासकामांवर भर देण्यात येत आहे. त्यासाठी स्थायी समितीच्या अध्यक्षपदी अनुभवी नगरसेवक हिरानंद ऊर्फ डब्बू आसवानी यांची वर्णी लावण्यात आली.
आसवानी यांनीही आपल्या राजकीय अनुभवाचा राष्ट्रवादीला पूरेपूर फायदा व्हावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी विविध कामांना स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात येत आहे. या कामांची टक्केवारी मिळविण्यासाठी स्थायी समिती सदस्यांमध्ये रस्सीखेच सुरू असते. यातूनच स्थायी समितीच्या सदस्य असलेल्या काँग्रेसच्या एका नगरसेविकेच्या पतीने स्थायी समितीचे सभापती डब्बू आसवानी यांच्याशी वाद घातला. महापालिकेतील स्थायी समिती सभापतींच्या कक्षाच्या अँटीचेंबरमध्ये टक्केवारी कमी मिळाल्याचे सांगत या नगरसेविकेच्या पतीने वाद घातला.
या वादानंतर स्थायी समितीच्या अन्य सदस्यांकडून आणि सभापतींकडून सारवासारव करण्यात येत आहे. संबंधित नगरसेविकेच्या प्रभागातील काम होण्याबाबतचा विषय असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले, तरी ‘स्थायी’च्या ‘टक्केवारी’ची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.