निर्भीडसत्ता न्यूज –
कागल | प्रतिनिधी
कागल येथील महामार्गावर हाॅटेल वॅन्टेज जवळ बेळगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोव्हा मोटरकारला अपघात झाला. या अपघातात कारचा चालक राजू अण्णापा चिकूगोळ (वय 27 ) अंकलगी ता.गोकाक.जि बेळगाव याचा जागीच मृत्यु झाला. तर चार जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी रात्री दीडच्या सुमारास झाला. याबाबतची फिर्याद विश्वनाथ बळवंत माळगे यांनी कागल पोलिसात दिली आहे. अपघाताची नोंद कागल पोलिसात झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी बेळगाव येथील मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी चोरीच्या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी बेळगाव येथील इनोव्हाकार क्रमांक के.ए.22 सी 3866 भाडेतत्त्वावर घेऊन मुंबई येथे 25 जानेवारी रोजी गेले होते. अंधेरी वेस्ट येथे संबंधित आरोपीला पकडले. आरोपी नुर अहमद गुलाम शेख रा. अंधेरी वेस्ट हा अल्पवयीन आहे, त्याला शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता मुंबई येथून निघाले. त्यांची मोटरकार कागल येथील महामार्गावर हाॅटेल वॅन्टेज येथे भरधाव वेगात आली असता रस्ता दुभाजकाला जोरात धडकली, धडकेत दुभाजकाचे लोखंडी बार समोरच्या काचेतून गाडीत घुसले. त्यामुळे चालक राजू चिकूगोळ हा जागीच ठार झाला. तर कारमधील पोलीस काॅन्स्टेबल अशिर अहमद जमादार (सुभाष नगर बेळगाव), रावसाहेबअण्णपा कणकरेड्डी (समतिर्थनगर बेळगाव ),विश्वनाथ बळवंत माळगे (अशोक नगर, बेळगाव )आणि चोरीतील आरोपी नुरमहमद गुलाम शेख (अंधेरी वेस्ट, मुंबई )हे जखमी झाले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार परशराम पाटील करीत आहेत.