निर्भीडसत्ता न्यूज –
पूर्णानगर येथील शनिमंदिराशेजारील पटांगणावर गुरुवारपासून चार दिवसीय स्वरसागर महोत्सवाला प्रारंभ झाला. पखवाज आणि तबल्याचा आसमंतामध्ये भरुन राहिलेला दमदार सूर, त्याला लालित्यपूर्ण नृत्याची साथ आणि या संपूर्ण संरचनेचे मर्म उलगडून सांगणारे तालयोगी असा बहारदार त्रिवेणी संगम तालयात्रेच्या निमित्ताने रसिकांनी अनुभवला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकोणिसाव्या स्वरसागर महोत्सवात तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी पंचवीस सहकलाकारांसह सादर केलेल्या बहारदार तालयात्रेत रसिक तल्लीन झाले.
ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी त्यांच्या संकलप्नेवर आधारित तालयात्रा हा एक अनोखा कार्यक्रम सादर केला. यात त्यांच्यासह विविध वादक व नर्तक असे एकूण पंचवीस सहकलाकार सहभागी होते.
यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक विलास मडिगेरी, नगरसेविका अश्विनी बोबडे, योगिता नागरगोजे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे, संयोजक व सहशहर अभियंता प्रवीण तुपे, सहसंयोजक संजय कांबळे, सुरेखा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
ताल, लय, गायन आणि नृत्य यांचा अपूर्व संगम असलेल्या या बहारदार प्रस्तुतीची सुरुवात राग हंसध्वनी, ताल धमारातील गणेशस्तुतीने झाली. शिवपरण, गणेशपरण यांचा अद्भुत संगम असलेले पखवाज आणि कथ्थक नृत्यातील तोडे, परण यांनी सजलेले हे वादन व नर्तन रसिकांना मंत्रमुग्ध करुन गेले. त्यानंतर झपतालातील बिंदादीन महाराजांची शाम छबी अति बध ही विख्यात रचना सादर करण्यात आली. यातील लयकारी अवघड असते पण क्लिष्ट नाही असे याची वैशिष्ट्य यावेळी सुरेशजींनी समजावून सांगितले. राग सोहनीमधील आडाचौतालातील गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांनी रचलेली चलो हटो पिया अब निक नाओ ही अष्टनायिकांपैकी खंडिता ही नायिका प्रस्तुत करणारी देखणी रचना सादर केली. या तालयात्रेचा समारोप आज बस गयी शामजीकी सुरतीया या सुंदर रचनेने झाला.
या बहारदार तालयात्रेमध्ये दमदार मृदंग वादन गोविंद भिलारे, ओंकार दळवी, सुजीत लोहोरे, भागवत चव्हाण यांनी केले. तर समर्पक तबलासाथ आशय कुलकर्णी, ईशान परांजपे व सुरेशजींची कन्या व शिष्या सावनी तळवलकर – गाडगीळ यांनी केली. टाळाची साथ तेजस माजगावकर, केजॉनची साथ उमेश वारभुवन, कलाबाशची साथ ऋतुराज हिंगे यांनी व ड्रम्सची साथ अभिषेक भुरुक यांनी केली. नजाकतदार सतार साथ अनिरुद्ध जोशी यांनी व सिंथेसायजर साथ अनय गाडगीळ आणि संवादिनीची अभिषेक शिनकर यांनी केली. बहारदार गायन विनय रामदासन, नागेश आडगावकर यांनी केले. या नृत्य, वादन व गायन मैफिलीत लालित्यपूर्ण कथ्थक नृत्ये सादर केली, नृत्यकलाकार अस्मिता ठाकूर, शीतल काळगे, अमृता गोगटे, आयुषी दीक्षित, रजत पवार, गौरी स्वकुळ यांनी.
स्वरसागर महोत्सवातील शुक्रवारच्या दुस-या सत्रात ज्येष्ठ बासरीबादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य व पुतणे राकेश चौरसिया यांचे सुमधूर बासरीवादन झाले. त्यांनी राग जोग मधील बंदिश यावेळी सादर केली. सुरुवातीला आलाप करुन नंतर बंदिशीचे वादन केले. सुरांशी लीलया खेळत त्यांचे समेवर येणे परत वादनातील तयारी पेश करत तबलाच्या साथीने वादन करणे रसिकांना मोहवून गेले. कृष्णाच्या लडिवाळ बासरीचे मंत्रमुग्ध करणारे स्वर त्यांनी आसमंतात भरुन टाकले होते. बासरी वादनाचा शेवट एका पहाडी धूनने केला. त्यांचे कधी संपूच नये असे वाटणा-या या बासरीवादन रसिकांची टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. राकेशजींना तबलाच्या दमदार आणि जोशपूर्ण साथ पं. कालिनाथ मिश्रा यांनी केली.