निर्भीडसत्ता न्यूज –
गाझियाबद (उत्तरप्रदेश) येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय डिबेट स्पर्धेमध्ये अनुज भगवान पाटील मांडरे (ता.करवीर) याने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे आयोजन मॉडर्न कॉलेज ऑफ लॉ, गाझियाबाद (उत्तरप्रदेश) यांनी केले होते. अनुज पाटील हा पुणे ग्रामीण जिल्ह्यात सेवेत असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर.पाटील यांचा मुलगा आहे. या स्पर्धेत त्याला प्रसाद दिलीप घाग याने साथ दिली. या स्पर्धेत भारत देशातील वेगवेगळ्या २७ राज्यांतील स्पर्धक संघ सहभागी झाले होते. मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि १०,०००/- रूपयांचे रोख पारितोषिक देवून त्यास गौरविण्यात आले आहे.
अनुज पाटील हा सध्या भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज, कोथरूड, पुणे येथे तिसऱ्या वर्षात ”उद्योग व्यवस्थापन आणि कायदा पदवी” चे शिक्षण घेत आहे.
या यशाच्या तयारीसाठी त्याला न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य मुकूंद सारडा सर, सातारा येथील सेवानिवृत्त सहाय्यक संचालक अभियोक्ता लोखंडे, सेवानिवृत्त अपर पोलीस आयुक्त सी.जी.कुंभार (पुणे), लॉ कॉलेजच्या प्राध्यापिका उज्वला बेंदाले, विजया ढेरे आदींचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले.
शैक्षणीक अभ्यासक्रमा बरोबरच राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत प्रथम क्रमांकाने मिळवलेल्या या यशामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.