निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका आश्विनी बोबडे यांनी विधी समितीत काम करण्याची इच्छा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे व्यक्त केली होती. परंतू, त्यांना विधी समितीत संधी न देता, त्यांची क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सदस्य पदावर निवड केल्याचे शुक्रवारी महासभेत जाहीर करण्यात आले. यावर नगरसेविका बोबडे यांनी महासभेत नाराजी व्यक्त करीत आपण क्रीडा समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगून पक्षातील आयाराम नगरसेवकांवर निशाणा साधला. तसेच निष्ठावंतावर पक्षाचे नेते अन्याय करीत असल्याचे त्यांनी म्हटले. त्यावेळी महापाैर नितीन काळजे यांनी या विषयावर इथे बोलू नका, असे सांगताना थेट तुमचे वय किती ? असा प्रश्न केला.
यावेळी महापाैरांच्या या प्रश्नावर सभागृहातील महिला नगरसेविका निःशब्द झाल्या. याप्रसंगी महापाैरांना त्यांची चूक लक्षात येताच त्यांना संबंधित नगरसेविकेला खाली बसण्यास सांगितले. यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी नगरसेविका आश्विनी बोबडे यांच्याकडे जाऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत केला.