निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील वृक्ष मित्र व पर्यावरण प्रेमी यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात नगरसेवक हिंगे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महापालिकेच्या वतीने दरवर्षी उद्यान विभागामार्फत पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी वृक्ष लागवड केली जाते. परंतु, या चांगल्या उपक्रमात लोकसहभाग घेतला जात नाही. परिणामी महापालिकेने लागवड केलेल्या वृक्षांची निगा व संवर्धन राखले जात नाही. त्यामुळे महापालिकेने करदात्यांच्या पैशातून केलेला खर्च वाया जातो. शहरात अनेक वृक्ष मित्र व पर्यावरण प्रेमी आहेत. या सर्वांसाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात यावी. त्यामुळे शहरात वृक्ष संवर्धन व वृक्ष लागवडीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल. वाढत्या शहरीकरणात अशा जनजागृतीची नितांत आवश्यकता आहे.