निर्भीड न्यूज –
अनधिकृत मंगल कार्यालय मालकांनी पार्किंगची व्यवस्था न केल्याने पिंपरी-चिंचवडमधील वाहतूककोंडीची समस्या जटिल बनली आहे. त्यामुळे मंगल कार्यालयांना पार्किंग व्यवस्था करण्याची सक्ती आणि कार्यालयांसमोर “नो पार्किंग झोन” जाहीर केले जाणार आहे. त्याची अंमलबजावणी न करणारी मंगल कार्यालये पाडण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहे. तसेच दापोडी येथील हॅरिस ब्रिजजवळील वाहतूककोंडी कायमची सोडविण्यासाठी बापोडीतील रस्ते प्रायोगिक तत्त्वावर एकेरी करण्याचे आश्वासन वाहतूक पोलिसांनी दिले आहे, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत गुरूवारी (दि. ५) दिली.
महापालिकेने शहरातील रस्ते प्रशस्त करूनही वाहनचालक व नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः दापोडी येथील हॅरिस ब्रिज, भोसरी ते मोशी रस्ता, भोसरी ते आळंदी रस्ता आणि रहाटणी येथील जगताप डेअरी चौकात वाहनचालकांना नेहमीच वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. या सर्व ठिकाणची वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी कायमच्या उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार यांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गुरूवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
त्याची दखल घेऊन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे व वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी गुरूवारी दुपारी पाच वाजता भाजपच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. या शिष्टमंडळामध्ये भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, भाजप नेते सारंग कामतेकर, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार, नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे, नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, शीतल शिंदे, नामदेव ढाके, विलास मडिगेरी, सुरेश वाडकर आदींचा समावेश होता. आयुक्त वाघमारे व वाहतूक पोलिस उपायुक्त आव्हाड यांनी या शिष्टमंडळासोबत वाहतूककोंडीमागच्या कारणांवर चर्चा केली. शहरातील अनधिकृत मंगल कार्यालये ही वाहतूककोंडीमागील महत्त्वाची कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावर शिष्टमंडळाने शहरातील नागरिकांची वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची मागणी आयुक्त वाघमारे यांच्याकडे केली. त्यामुळे आयुक्त वाघमारे यांनी वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आव्हाड यांना अनधिकृत मंगल कार्यालयांसमोर करण्यात येणाऱ्या बेकायदा पार्किंगबाबत कडक कारवाईची सूचना केली. त्यानुसार शहरातील सर्वच मंगल कार्यालयांना स्वतःची पार्किंग व्यवस्था करण्याबाबत वाहतूक पोलिसांमार्फत आठ दिवसांची नोटिस बाजवण्यात येणार आहे. तसेच कार्यालयांसमोर रस्ता दुभाजक टाकण्यात येणार आहे. आठ दिवसांत पार्किंगची व्यवस्था न करता वाहतूककोंडीला कारणीभूत ठरणारी अनधिकृत मंगल कार्यालये महापालिकेमार्फत पाडण्याचे आश्वासन आयुक्त वाघमारे यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिल्याचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.
दापोडी येथील हॅरिस ब्रिजजवळ नित्याचीच झालेली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी बापोडी परिसरातील रस्ते प्रायोगिक तत्त्वावर एकेरी करण्याचे आश्वासन वाहतूक पोलिस उपायुक्त आव्हाड यांनी दिले आहे. तसेच पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी ते मोशीपर्यंतच्या वाहतूक समस्येसंदर्भात महापालिकेचे शहर अभियंता एम. टी. कांबळे, सहशहर अभियंता राजन पाटील आणि वाहतूक पोलिस यांची शुक्रवारी (दि. ६) सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे. हे सर्वजण रस्त्याची संयुक्त पाहणी करणार आहेत. त्यानंतर महामार्गाच्याकडेने ठिकठिकाणी नो-पार्किंग झोन करण्याचे आश्वासन वाहतूक पोलिस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी दिले आहे, अशी माहिती शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.