निर्भीडसत्ता न्यूज –
‘गोथिया कप’मधील सहभागाचा १० वा वर्धापनदिन साजरा करण्याच्या निमित्ताने एसकेएफ इंडियातर्फे पिंपरी-चिंचवड महारपालिका विभागातील शाळांसाठी एसकेएफ क्रीडा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. एसकेएफ शालेय क्रीडा शिक्षण कार्यक्रम असे नाव दिले आहे. त्याचे उद्घाटन एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल ऑर्सटाडीयस, महापौर नितीन काळजे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.
क्रीडा क्षेत्राच्या माध्यमाद्वारे मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक विकास घडवून आणणे हे एसकेएफच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांच्या प्रणेत्या एसकेएफ कम्युनिटी अंब्रेलाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या एसकेएफ शालेय क्रीडा शिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. शालेय विद्यार्थ्यांचा जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू म्हणून विकास घडवून आणण्यासाठी हा कार्यक्रम सहाय्यभूत ठरणार आहे. मुलांना एरवी नसतील अशा प्रकारच्या मुबलक क्रीडा संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्यातील निरामय प्रगतीला चालना देणे आणि समन्वित शिक्षण पुरविणे हे या कार्यक्रमाचे ध्येयधोरण आहे.
चिंचवड येथील एसकेएफ प्रकल्पाच्या परिसरातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील ८० गुणवान मुले आणि मुलींची निवड केली जाणार असून या विद्यार्थ्यांना ते शिकत असलेल्या शाळेत व्यावसायिक प्रशिक्षकांद्वारे आठवड्यातून दोन वेळा फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जुलै २०१८ च्या शैक्षणिक वर्षात सुरू झालेला हा कार्यक्रम मे २०२३ पर्यंत चालणार आहे. या दरम्यान इयत्ता दुसरीपासून मुलांना शिकवण्यास सुरुवात केली जाणार असून ते इयत्ता १०वी मध्ये जाईपर्यंत त्यांना प्रशिक्षण दिले जात राहणार आहे. प्रत्येक शाळेत निवडक विद्यार्थ्यांसाठी एकूण ४८ प्रशिक्षण सत्रे घेतली जाणार आहेत. या कार्यक्रमाची प्रभावी अमलबजावणी व्हावी, नियमित गुणवत्ता पडताळणी व्हावी आणि एसकेएफ इंडियाच्या सीएसआर टीमला या सगळ्याचा तपशीलवार अहवाल मिळत राहावा यासाठी जेएफकेतर्फे एका खास कार्यक्रम व्यवस्थापकाची नेमणूक केली जाणार आहे. जस्ट फॉर किक्स द्वारा आयोजित इतर लीगमध्ये सहभागी होण्याची संधी मिळवून देण्यासाठी देखील अमलबजावणी भागीदार प्रयत्नशील राहणार आहेत.
एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल ऑर्सटाडीयस म्हणाले, “एसकेएफ क्रीडा कार्यक्रम हा क्रीडा क्षेत्रातील वैयक्तिक क्षमताबांधणी करणे आणि औपचारिक प्रशिक्षण व सामाजिक कौशल्य वृद्धीद्वारे त्यांचा क्षमताविस्तार करणे या दृष्टीने आखण्यात आलेला आहे. समाजाचे देणे त्यांना पुन्हा चुकते करण्यासाठी समाजासाठी सक्षम कार्यक्रम तयार करण्यावर आमचा गाढ विश्वास आहे.