सभागृहनेते एकनाथ पवार; महापालिकेमार्फत खड्डे बुजविण्याचे काम सुरू
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवडच्या शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे पाऊस थांबल्यानंतर तातडीने बुजवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. शहरातील एकाही रस्त्यावर खड्डा दिसू नये अश्या सक्त सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रशासन खड्डे बुजवण्याच्या कामाला लागले आहेत, परंतु खड्ड्यांवरून पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीने नौटंकीचे आणि प्रसिद्धी मिळवण्याचे राजकारण करू नये, अशा शब्दात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी खड्ड्यांचे राजकारण करणा-या विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांच्या नेत्यांना प्रतीउत्तर दिले.
राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते प्रसिद्धीलोलुप आहेत. पत्रकबाजी करायची आणि प्रसिद्धी मिळवायची याच एकमेव कामात विरोधी पक्षनेते दत्ता साने शहरातील जनतेला दिसून येत आहेत. समाज उपयोगी कामे करायची सोडून ते आपल्या विरोधी पक्षपदाचा कालावधी वाया घालवत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी काम करताना दिसत नाहीत. सर्व सामान्य नागरिकांची दिशाभूल करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यात राष्ट्रवादीला धन्यता वाटत आहे. शहरातील सुज्ञ जनता राष्ट्रवादीचा दुटप्पीपणा ओळखून आहे.मागील काळात काही ठोस आणि रचनात्मक काम केले असते, तर पिंपरी चिंचवड शहराचे भले झाले असते, आणि सत्ता गमवावी नसती लागली. आजही राष्ट्रवादीला सत्तेच्या भिकेचे डोहाळे लागले आहेत.
यापूर्वी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना पावसाळ्यात शहरातील खड्ड्यांची काय अवस्था होती हे संपूर्ण शहराला माहीत आहे. राष्ट्रवादीच्या या नाकर्तेपणामुळेच शहरातील जनतेला वेगळा विचार करावा लागला. जनतेने पूर्ण विश्वासाने भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली आहे. आम्ही जनतेशी बांधील आहोत, या शहरातील जनतेला कोणताही त्रास होणार नाही अश्या पद्धतीने भाजप सत्तेचा उपयोग करेल, कोणताही मुद्दा नसलेल्या राष्ट्रवादीकडे खड्ड्यांच्या प्रश्नावर विनाकारण ‘बोंबाबोंब’ करू नये असा टोला पक्षनेते पवार यांनी लावला.