निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड शहरात पावसाळ्यातील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने जेट पॅचर मशिन ठेकेदारी तत्वावर घेतले आहे. एक चौरस मीटरचा खड्डा बुजविण्यासाठी 1 हजार 200 रूपये दर आहे. केवळ 4 महिन्यांच्या कामासाठी तब्बल 2 कोटी 80 लाखांचे बिल अदा केले जाणार आहेत. सर्व प्रकारच्या खड्डे दुरूस्तीसाठी ही यंत्रणा उपयुक्त नाही. हे काम ठेकेदारांसाठी कुरण ठरत असून, भरमसाट खर्च करूनही शहरातील खड्डे दुरूस्त होत नसल्याचे विरोधक दावा करीत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात रस्ते विकसित करण्यासाठी व डांबरीकरणासाठी दरवर्षी कोट्यवधीचा खर्च स्थापत्य विभागाकडून केला जातो. तरीही दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडून रस्त्यांची चाळण होते. शहरातील विविध भागांतील खड्ड्याचे छायाचित्र ‘पुढारी’ने वेळोवेळी प्रसिद्ध केले आहेत. रस्त्यावर खड्डे पडल्यास ठेकेदारांकडून दुरुस्ती करून घेणे किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. मात्र, पालिका प्रशासनाने कारवाई करणे सोडून खड्डे बुजविण्यासाठी 8 कोटी 40 लाख रुपयांचे कंत्राट काढले आहे.
‘जेट पॅचर पोथॉल पॅचिंग मशिन’ हे नवीन खड्डे बुजविण्यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काढण्यात आलेल्या निविदा 8 कोटी 32 लाख 41 हजार रूपयांमध्ये नागपूरच्या अंजनी लॉजिस्टिक या ठेकेदाराला मंजूर झाली आहे. या कामाची मुदत 3 वर्षे आहे. मात्र, प्रत्यक्षात पावसाळ्यातील केवळ 4 महिने खड्डे बुजविण्याचे काम केला जाणार आहे. पावसाळ्यातील 3 महिन्यात सुमारे 2 कोटी 80 लाख रुपयांचा खर्च या कामावर होणार आहे. मात्र, पहिल्याच पावसाळ्यात या कामाची फोलपणा उघड झाला आहे.
पावसातील जून व आतापर्यंत शहरातील 4 हजार 465 खड्ड्यांपैकी जेट पॅचर मशीनच्या सहायाने केवळ 458 खड्डे बुजविल्याची आकडेवारी स्थापत्य विभागाने दिली आहे. मुख्य रस्त्यावरील एक ते दीड इंचाचे खड्डे बुजविण्यासाठीच या तंत्राचा वापर होतो. शहरासाठी सर्व खड्ड्यासाठी ही यंत्रणा निष्फळ ठरत असली तरी, पालिका केवळ 4 महिन्यांसाठी तब्बल 2 कोटी 80 लाखांचा खर्च करीत आहे.
अबब… एक खड्डा बुजविण्यासाठी महापालिकेला १८ हजारांचा खर्च ?पावसामुळे शहरात आतापर्यंत एकूण 4 हजार 465 खड्डे पडले असून, त्यातील 4 हजार 19 म्हणजे 90 टक्के खड्डे बुजविल्याचा दावा स्थापत्य विभागाने केला आहे. जेट पॅचरने त्यापैकी 458 खड्डे बुजविले असून, त्याचा आकार 5 हजार 484.25 चौरस मीटर आहे. जेट पॅचर मशीनचे ठेकेदाराने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील किमान 1 हजार 900 चौरस मीटर आकाराचे खड्डे बुजवायचे अट घातली आहे. त्यानुसार चार महिन्यात जास्तीत जास्त 15 हजार 200 चौरस मीटर आकाराचे खड्डे बुजविले जाणार आहेत. चार महिन्यात जवळपास 1 हजार 500 खड्डे या मशीनच्या सहायाने बुजविले जाऊ शकतात. त्या प्रमाणे चार महिन्यात 2 कोटी 80 लाखांचा खर्च आणि 1 हजार 500 खड्डे बुजविल्यास प्रति खड्डा 18 हजार रुपये इतका खर्च असल्याचे स्पष्ट होत आहे.