निर्भीडसत्ता न्यूज –
वाचन, मनन व चिंतनाने सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना यशस्वी होता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन धारेश्वर विद्या व क्रिडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान ऊर्फ काकासाहेब चव्हाण यांनी केले.
वाचन संस्कृती वाढावी यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सप्टेंबर महिन्यात विविध ठिकाणी लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत धायरी येथील बंडोजी खंडोजी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना काकासाहेब चव्हाण बोलत होते. यावेळी प्राचार्य विलास खाडे, माहिती उपसंचालक मोहन राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना, काकासाहेब चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करुन वाटचाल केल्यास यश मिळणे सोपे जाते, असे सांगितले. लोकराज्य मासिकामध्ये शासनाने घेतलेल्या निर्णयाचे प्रतिबिंब पहायला मिळते. या मासिकाममधील माहिती कुटुंबातील सर्वांसाठी उपयोगी असल्याने अन्य साहित्य वाचतानाच लोकराज्य मासिकाचे नियमित वाचन विद्यार्थ्यांनी करावे, असे सांगितले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी, लोकराज्य मासिकाच्या नियमित वाचनाने वाचन संस्कृती वाढेल असा विश्वास व्यक्त् केला. लोकराज्य मासिक वाचनाने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतानाच प्रगल्भता वाढण्यास मदत होते, त्यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळणे सोपे होते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावी व ती प्रत्यक्षात आणण्यासाठी मेहनत करावी, अशी सूचना केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश भुकेले यांनी केले तर आभार प्रदर्शन माहिती सहायक जयंत कर्पे यांनी मानले. कार्यक्रमाला नितीन सोनवणे, संजय गायकवाड, विशाल कार्लेकर, मिलींद भिंगारे, विशाल तामचीकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्यने उपस्थित होते.