मेढा । जावळी
निर्भीडसत्ता न्यूज –
मेढा येथील मोरया गोविंदा पथकाने जिल्ह्यातील 7 ठिकाणच्या दहीहंडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत दहीहंडी स्पर्धेत आपला दबदबा जिल्ह्यात कायम राखला असून गेली 7 वर्षे मोरया गोविंदा पथकाने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बक्षिसे मिळवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
मोरया गोविंदा पथकाने एकीच्याच बळावर 2011 पासून मोरया गोविंद पथकाने भरारी घेतली आहे. सुमारे 90 ते 100 तरुणांच्या या पथकाने आजपर्यंत सातारा, उंब्रज, कराड, फलटणसह सांगली जिल्ह्यातही अनेकदा 7 थरापर्यंत थर रचित प्रथम क्रमांकाची बक्षिसे पटकावली आहेत.
दरम्यान, यावर्षी मेढा, सातारा व वाई अशा 3 ठिकाणी एकूण 7 स्पर्धेत मोरया गोविंदा पथकाने प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळवून आपला ठसा उमटवला आहे. यावर्षी मेढा येथील मुख्य बाजार चौकातील दहीहंडी, वाई येथील मावळा प्रतिष्ठान, सातारा येथील विक्रम(पापा) पवार मित्र समूहाची छत्रपती दहीहंडी, मनसेची दहीहंडी, बाळासाहेब खंदारे मित्र समूह, दीपक पवार मित्र समूहाची भाजपाची दहीहंडी, राजे प्रतिष्ठान व रावण ग्रुपची भव्य दहीहंडी या सर्व दहीहंडी स्पर्धेत मोरया गोविंदा पथकाने प्रथम क्रमांक पटकावत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
जावळीतून या यशाबद्दल पथकातील गोविंदांचे भैरवनाथ युवा क्रीडा मंडळ,ग्रामस्थ मंडळ जवळवाडी, भैरवनाथ विकास मंडळ जवळवाडी, मेढा ग्रामस्थ यासह तालुक्यातील अनेक संस्था, मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.