निर्भीडसत्ता न्यूज –
पेट्रोल, डिझेलच्या किंमतीबाबतचे धोरण युपीए सरकारच्या कार्यकाळात ठरविण्यात आले आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या किंमतींच्या परिणामामुळे भाववाढ होत आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही जनतेचीच मागणी आहे. त्या पदासाठी ते सक्षम आहेत. तसेच मेहनती आणि प्रयत्नवादी आहेत. आगामी निवडणूकीला विरोधकांपुढे काहीच मुद्दा नसल्यामुळे विरोधक भाववाढीचा मुद्दा काढत असल्याची टिका सोमाभाई मोदी यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांनी मंगळवारी (दि. 16 ऑक्टोबर) पुणे, आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी च-होली येथील साई मंदीरात भेट दिली. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विकास रासकर श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे, विश्वस्त शिवकुमार नेलगे, सदन कमांडचे संचालक संजीवकुमार, शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त डी. एच. इनामदार, वसंतराव पिंपळे आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सोमाभाई मोदी म्हणाले की, त्यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळाबाबत आपण पुर्ण संतुष्ट आहोत. सर्व काही मोफत मिळाले तर अच्छे दिन येतील असे नाही तर त्यासाठी कष्ट केले पाहिजे. मोदींनी कष्ट करुनच देशात स्वच्छ भारत अभियान यशस्वी केले आहे. देशभर शाळा, महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय उभारली आहेत. त्यामुळे आरोग्याचा व शिक्षणाचा आलेख उंचावला आहे. महिला, मुलींवरील अत्याचाराबाबत प्रश्न विचारला असता सोमाभाई मोदी म्हणाले की, आई, वडील ज्याप्रमाणे मुलींना बंधनात ठेवतात तसे त्यांनी उशीरा घरी येणा-या मुलांना देखील प्रश्न विचारले पाहिजेत. मुलगा, मुलगी भेदभाव न करता त्यांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजेत. देशातील शेती पाऊसावर अवलंबून असल्यामुळे पाण्याचा थेंब अन थेंब जपून वापरला पाहिजे असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त सुभाष नेलगे यांच्या हस्ते सोमाभाई मोदी यांच्या शाल, श्रीफळ व साईंची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला.