निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पक्ष नेतृत्वाचा आदेश मान्य करत विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा आज मंगळवारी (दि. 9) महापौर कार्यालय व शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे सुपूर्द केला. शहराध्यक्ष वाघेरे यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार आहे, याबाबत उत्सुकता आहे.
राष्ट्रवादीने ठरविलेल्या धोरणानुसार पक्षातील पाच नगरसेवकांना प्रत्येकी एक वर्ष विरोधी पक्षनेते पदावर संधी देण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला आहे. त्यानुसार साने यांच्या पदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांना अजित पवार यांनी राजीनामा देण्याची सूचना केली होती. त्यानुसार त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. दत्ता साने यांनी आपल्या कार्यकाळात सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडले. साने यांनी अनेक विषयांना त्यांनी हात घालत सत्ताधारी पक्षाचा पारदर्शकतेचा बुरखा फाडला.