दोन दिवसांत निवड होण्याची शक्यता
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आपल्या पदाचा पक्षाकडे राजीनामा दिला आहे. आता या पदावर राष्ट्रवादीच्या आणखी एका नगरसेवकाला संधी दिली जाणार आहे. पिंपळेसौदागरमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याचे निश्चित झाल्याचे समजते. आगामी विधानसभा निवडणूक आणि पिंपळेसौदागर परिसराचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश या दोन गोष्टींचा राजकीय विचार करून राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपदासाठी नाना काटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगण्यात येत आहे.
महापालिकेत सलग १५ वर्षे सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादीला शहरातील मतदारांनी २०१७ च्या महापालिका निवडणुकीत नाकारले. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ३६ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे शहरातील मतदारांनी राष्ट्रवादीला विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावण्यास सांगितले आहे. राष्ट्रवादीने पहिल्या वर्षी ज्येष्ठ नगरसेवक व माजी महापौर योगेश बहल यांना विरोधी पक्षनेतेपद देऊन महापालिकेत भाजपच्या सत्तेवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी दिली. बहल हे अभ्यासू असल्याने महापालिकेतील राजकीय समीकरणांचा विचार करून आपल्या परीने भाजपला नामोहरम करण्याचे काम केले. परंतु, त्यांना त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी बेजार करून अखेर विरोधी पक्षनेतेपदावरून उखडून फेकले. या पदावरून पक्षात बेदिली माजल्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांनी या पदाची संगीत खुर्ची करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विरोधी पक्षनेतेपदावर प्रत्येक वर्षाला नवीन नगरसेवकाची निवड करण्यास सुरूवात केली आहे.
- योगेश बहल यांच्यानंतर दुसरे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. साने यांनी आक्रमक होत भाजपच्या कारभाराची चिरफाड करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या अभ्यासूपणाचा अभाव दिसून आला. अनेक मुद्द्यावर साने यांची बोटचेपी भूमिकाही दिसून आली. परंतु, पदाच्या एक वर्षांच्या कार्यकाळात ते कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून सातत्याने चर्चेत राहिले. एक वर्षांचा कालावधी संपल्याने अखेर पक्षाने दत्ता साने यांच्याकडून राजीनामा घेतला आहे. महापौर राहुल जाधव हे शहराबाहेर असल्यामुळे त्यांनी पक्षाकडे राजीनामा दिला आहे. आता हा राजीनामा महापौर जाधव यांच्याकडे दिला जाणार आहे. त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी नवीन नगरसेवकाची निवड झाल्याची नोंद केली जाणार आहे. महापालिका कायद्यानुसार गटनेता हाच विरोधी पक्षनेता असतो. त्यामुळे राष्ट्रवादीकडून गटनेता म्हणून ज्या नगरसेवकाच्या नोंद केली जाईल, त्याच नगरसेवकाच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडणार आहे.
दत्ता साने यांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी पिंपळेसौदागरमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे समजते. वास्तविक गेल्यावेळी दत्ता साने यांच्या जागेवर नाना काटे यांचेच नाव निश्चित करण्यात आले होते. परंतु, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या आग्रहाखातर दत्ता साने यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते. आता साने यांच्यानंतर नाना काटे यांचेच नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी निश्चित असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणूक आणि पिंपळेसौदागरचा स्मार्ट सिटीत झालेला समावेश या दोन मुद्द्यांचा राजकीय विचार करून नाना काटे यांनाच विरोधी पक्षनेतेपद दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.