निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जुन्या सांगवीतील नॅशनल स्कूल ते स्पायसर स्कूल पुल या मुळा नदीकडेच्या समांतर रस्ताचे अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिका तब्बल 7 कोटी 14 लाख खर्च करणार आहे. मात्र, त्यातील अनेक ठिकाणचा रस्त्याची जागा अद्याप पालिकेच्या ताब्यात नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
सांगवी परिसरातील काही रस्ते काँक्रीटचे करण्यात आले आहेत. आता, नॅशनल स्कूल, शुभ श्री बिल्डींग ते स्पायसर स्कूल पुलापर्यंत आणि परिसरातील रस्ते अत्याधुनिक पद्धतीने विकसित केला जाणार आहे. त्यासाठी पालिकेने 8 कोटी 25 लाख 92 हजार 761 खर्चाची निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात बी. के. खोसे यांनी 14.15 टक्के कमी, श्रीगणेश कॅन्स्ट्रक्शनने 12.90 टक्के कमी आणि एच. सी. कटारिया यांनी 12.60 टक्के कमी दराने निविदा भरली होती.
सर्वांधिक कमी दर असलेल्या बी. के. खोसे यांची निविदा पात्र ठरली. संबंधित ठेकेदाराला काम देण्यास स्थायी समितीने ऐनवेळी शुक्रवारी (दि.12) मंजुरी दिली. मात्र, सदर रस्त्यावर अनेक घरांचे अतिक्रमण कायम आहे. तसेच, एका झोपडपट्टीचेही अतिक्रमण आहे. त्या जागा ताब्यात घेण्यात पालिकेने अद्याप काहीच कार्यवाही केली नसल्याचे चित्र आहे.
अशी परिस्थिती असताना हा मार्ग अत्याधुनिक पद्धतीने विकसित केला जात आहे. त्यासाठी पालिका तब्बल 7 कोटी 14 लाख रूपये खर्च करीत आहे. परिणामी, जागे अभावी विलंब होऊन काम रखडण्याची दाट शक्यता आहे.