निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे दरमहा नियमितपणे वेतन घेणारे अनेक कर्मचारी अन्य शासकीय कार्यालयात अनेक वर्षांपासून काम करीत आहे. अशा कर्मचार्यांचा शोध घेतला जात आहे.
अशा कर्मचार्यांमुळे पालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे कामे संथ गतीने होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याची दखल घेऊन पालिका प्रशासनाने इतर शासकीय कार्यालयात असलेल्या कर्मचार्यांची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे.
पालिका आस्थापनावरील काही कर्मचारी पीएमआरडीए, निवडणूक, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय आदी ठिकाठी वर्षानुवर्षे काम करीत आहेत. तेथे काम करीत असले तरी, त्यांना वेतन पालिकेकडून दिले जात आहे. असे कर्मचारी त्या ठिकाणच काम करीत असल्याने पुन्हा पालिकेत येत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. पालिकेचे अनेक क्रीडा शिक्षक व कर्मचारी तर अनेक वर्षांपासून निवडणुक विभागात ठाण मांडून आहेत.
संबंधित शासकीय कार्यालयात काम संपल्यानंतर पुन्हा पालिका सेवेत रूजू होण्याचा नियम आहे. मात्र, शासकीय कार्यालयात काम करण्याची सक्ती नसते. त्यांच्यावर फारसे बंधन नसतात. त्यामुळे ते मनमर्जीपणे वावरत असतात. असे करूनही त्यांना दरमहा वेतन मिळत असते. त्यामुळे ते कर्मचारी अक्षरश: मुजोर झाले आहेत.
ही बाब पालिका प्रशासनाच्या निर्दशनास आली आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व विभागप्रमुखांना संबंधित विभागाच्या अशा कर्मचार्यांची माहिती मागविली आहे. त्यावरून इतर ठिकाणी नेमके किती कर्मचारी काम करतात, हे स्पष्ट होणार आहे.