निर्भीडसत्ता न्यूज –
गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेसचे सरकार मंगळवारी (दि. २३) कोसळले. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारविरोधातील विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाले. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ९९ मते पडली, तर ठरावाच्या विरोधात १०५ मते पडल्याने कुमारस्वामी सरकार अखेर पडले. अवघ्या चार मतांनी कुमारस्वामींना बहुमत गमवावे लागले आहे. त्यामुळे कर्नाटकात भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे.
कुमारस्वामी सरकारला आज विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्नाटकात कलम १४४ लागू करण्यात आले होते. दुसरीकडे कर्नाटक विधानसभेत सकाळपासूनच खडाजंगी चर्चा सुरू होती. माझे श्रेत्र सिनेमा निर्मितीचे आहे. मी सिनेनिर्माता आहे. राजकारण हे माझे श्रेत्र नाही. मी अपघातानेच मुख्यमंत्री झालो, असे सांगतानाच सत्ता कायमस्वरुपी राहत नाही. मी फ्लोअर टेस्टला तयार आहे, असे भावूक भाषण कुमारस्वामी यांनी केले.
त्यानंतर संध्याकाळी ७.३० वाजता कुमारस्वामींनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यानंतर विधानसभेतील उपस्थित आमदारांची मोजदाद करण्यात आली आणि नंतर विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्यात आले. १६ बंडखोर आमदार विधानसभेत अनुपस्थित राहिल्याने बहुमताचा आकडा १०३ वर आला. मात्र कुमारस्वामींना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. ठरावाच्या बाजूने केवळ ९९ मते पडल्याने अवघ्या चार मताने कुमारस्वामी सरकार कोसळले. तर ठरावाच्या विरोधात १०५ मते पडली. यावेळी भाजपचे एकही मत फुटले नाही. जेडीएस-काँग्रेसचे १६ बंडखोर आमदार सभागृहात अनुपस्थित राहिले तर बसपाचा उमेदवार तटस्थ राहिल्याने कुमारस्वामींना विश्वासदर्शक ठराव जिंकता आला नाही.
भाजपचा जल्लोष
विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात कुमारस्वामी सरकार अपयशी ठरल्यानंतर भाजपने एकच जल्लोष केला. सरकार कोसळल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन भाजप नेते बी. एस. येदीयुरप्पा यांचे अभिनंदन केले. काही आमदारांनी तर येदीयुरप्पा यांचे दर्शनही घेतले.