निर्भीडसत्ता न्यूज – सेक्रेड गेम्स या वेब सिरिजमध्ये महत्त्वाचा रोल साकारणाऱ्या एल्नाज नोरौजी हिला अमेरिकेतील एका विमानतळावर रोखल्याचा प्रकार घडला. तिच्या ईराणी कनेक्शनचे कारण देत शिकागो विमानतळावर तीन तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी चौकशी करण्यात आली. यामुळे तिला आपली फ्लाईटदेखील सोडावी लागली. एल्नाज नोरौजी ही ईराणची नागरिक आहे.
तब्बल तीन तास आपल्याला चौकशीसाठी इमिग्रेशनमध्ये थांबावे लागले असल्याचे एल्नाजने सांगितले. तसेच यादरम्यान तिला कनेक्टिंग फ्लाईटदेखील सोडावी लागली. ”माझ्याकडे जर्मनीचा पासपोर्ट आहे. त्यामुळे अमेरिकेत प्रवास करताना व्हिसाची गरज भासत नाही. परंतु ट्रम्प प्रशासनाने ईराणवर लावलेल्या निर्बंधांमुळे मी व्हिसासाठी अर्ज केला आहे. परंतु निर्बंधांमुळे ईराणी नागरिकांना ESTA देखील देण्यात येत नाही. त्यामुळे अधिकारी बरेचदा अनेकवेळा चेकींग करतात,” असेही ती म्हणाली.
”इमिग्रेशनदरम्यान मला अनेक प्रश्न विचारण्यात आले. तसेच बराच वेळ चौकशी सुरू असल्यामुळे आपली फ्लाईटदेखील मिस झाले. त्यानंतर तब्बल 6 तासांनी पुढील फ्लाईट होते. त्यामुळे मला विमानतळावरच प्रतिक्षा करावी लागली,” असे एल्नाज म्हणाली. सेक्रेड गेम्समध्ये एल्नाज नोरौजी हिने झोया मिर्झा ही भूमिका साकारली होती. पुन्हा एकदा ती सेक्रेड गेम्सच्या नव्या सिझनमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 15 ऑगस्टपासून सेक्रेड गेम्स 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.