निर्भीडसत्ता न्यूज – विकृत मानसिकता ही समाजाला लागलेली कीड आहे. ती समाजाला पोखरत आहे, त्रास देत आहे. त्यामुळे विकृत मानसिकतेला लगाम घालणे महत्वाचे आहे, असे मत महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी व्यक्त केले आहे. त्या पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. सांगवी येथे अडीच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता, त्या पीडित कुटुंबाची रहाटकर यांनी आज भेट घेतली.
विजया रहाटकर यांनी यावेळी म्हटले की, अडीच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला या संताप जनक घटनेची दखल महिला आयोगाने घेतली आहे. आरोपी लवकर मिळतील अशा प्रकारचा पोलिसांचा तपास सुरू आहे. विकृत मानसिकता सर्वात मोठी अडचण असून तिला लगाम घालणे महत्वाचे आहे. ती समाजाला लागलेली कीड आहे. समाजाला पोखरत आहे, त्रास देत आहे. त्यामुळे कोणाला एकाला दोष देणे, योग्य होणार नाही. आपला समाज आपण सावरायला हवा. नागरिकांवर चांगल्या अर्थाने चांगले वागण्याचा नैतिक दबाव असला पाहिजे असेही त्या म्हणाल्या. तसेच, यंत्रणेने देखील काम केले पाहिजे. पण प्रत्येक वेळी आपण यंत्रणेला दोष देऊन मोकळे होतो. समाजामध्ये नैतिक अधपतन होत आहे, हे थांबविण्याचे काम सगळ्यांचेच आहे असे त्यांनी सांगितले.