निर्भीडसत्ता न्यूज – ‘भाजप हा राजकीय पक्ष नसून सत्तेची भूक असलेला बकासुर आहे. त्याची भूकच भागत नाही. पण या भुकेमुळे आणि फोडाफोडीमुळे त्यांच्याच पक्षातील एकनाथ खडसेंसारखे अनेक नेते दु:खी आहेत. हे दु:खी लवकरच आमच्याकडे येतील,’ असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज केला.
नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘भाजपला सत्तेची हाव आहे. त्यातून महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यात त्यांच्याकडून फोडाफोडी सुरू आहे. भुजबळ शिवसेनेत जाणार या वावड्या आहेत. भाजपची प्रचारयंत्रणा अशा खोट्या बातम्या पेरतेय. ती त्यांची रणनीती आहे,’ असा आरोप थोरात यांनी केला.
‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. सर्व गटा-तटांना सोबत घेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांमुळे काही लोकांना असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे सध्या भाजप-सेनेत प्रवेश होत आहेत. मात्र, त्यामुळे काँग्रेसमध्ये युवकांना संधी मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीशी आमची चर्चा सुरू आहे. तसे पत्रही आम्ही त्यांना दिले आहे,’ असे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेण्याचा अद्याप कुठलाही प्रस्ताव नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.