निर्भीडसत्ता न्यूज |
पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यातील 27 महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम निश्चित झाला असून सर्व महापालिकेच्या महापौर पदाची आरक्षण सोडत आज बुधवारी (दि. 13) मुंबई येथे काढली जाणार आहे. त्यामुळे, सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर पदासाठी कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण निश्चित होणार हे आज स्पष्ट होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यातील 27 महापालिकांच्या महापौर पदाचा कार्यकाल संपुष्टात येत आहे. त्यामुळे आगामी काळात महापौर हे पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित राहणार यासाठी ही सोडत काढली जाणार आहे. उद्या मुंबईत मंत्रालयात सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात प्रधान सचिव (नवि-2) यांच्या अध्यक्षतेखाली सोडत काढली जाणार आहे.
सोडत काढत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहुल जाधव, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, सभागृहनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण अप्पर सचिव सचिन सहस्त्रबुध्दे यांनी महापालिकेला दिले आहे.