निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखलीतील जल शुद्धीकरण केंद्रासाठी अडथळा ठरणारी सर्व झाडे तत्काळ तोडून टाका. योग्य झाडांचे पुर्नरोपण करा. ही प्रक्रिया येत्या 3 दिवसात पूर्ण करून, जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू करा, असे सक्त आदेश महापौर उषा ढोरे यांनी पालिका अधिकार्यांना दिले आहेत.
चिखलीतील बगवस्तीच्या गायरान जागेतील जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामांचे आदेशही दिले गेले आहेत. जलशुद्धीकरण केंद्राचा कामास गती मिळावी म्हणून तेथील झाडांची पाहणी करण्यासाठी महापौर ढोरे यांच्यासह सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी मंगळवारी (दि.3) केली. या वेळी सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, उपअभियंता राजेंद्र मोराणकर, चंद्रकांत मुठाळ, ठेकेदार रुद्राणी इन्फ्रास्ट्रकचर व गोंडवाणा इंजिनिअर्स लिमिटेडचे प्रतिनिधी उपस्थित होते. पाहणीनंतर महापौरांनी अधिकार्यांना सदर आदेश दिले.
या ठिकाणी सुमारे 1 हजार 527 झाडे आहेत. जलशुद्धीकरण केंद्राचे काम तातडीने मार्गी लावण्याचा चंग सत्ताधार्यांनी बांधला आहे. पाहणीत महापौर ढोरे यांनी सांगितले की, झाडाची पुर्नतपासणी व मोजणी करुन त्यातील काही झाडे वाचविण्याचा प्रयत्न करावा. जी झाडे काढणे आवश्यक आहे तेवढीच काढावी. काम त्वरीत सुरु करावे, अशा सूचना केल्या. केंद्र उभारणीच्या कामाची मुदत 24 महिन्यांची आहे. मात्र, पाणीपुरवठा विभागाने हे काम 12 ते 14 महिन्यामध्ये पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असाही सूचना त्यांनी केल्या.
बुधवार (दि.4), गुरुवार (दि.5) व शुक्रवारी (दि.6) असे 3 दिवसात केंद्रासाठी खोदाई करणे गरजेचे आहे. त्या भागातील झाडे काढून त्याची अन्य ठिकाणी पुर्नरोपण करावे. जी झाडे पुर्नरोपण करणे शक्य नाही ती काढून टाकावीत, असा सूचना अधिकार्यांना देण्यात आल्या.
ठेकेदाराने आवश्यक त्या यंत्रसामुग्री आणून काम चालु करुन एक महिन्याच्या कामाचा तपशील देण्याचा सूचना देण्यात आल्या. कामाच्या प्रगतीबाबत आठवड्यातून दोन वेळा एकनाथ पवार व विलास मडिगेरी यांची समिती कामाच्या ठिकाणी भेट देणार आहे.