निर्भीडसत्ता न्यूज |
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांसाठी तब्बल 80 कोटी खर्चास स्थायी समिती सभेने बुधवारी (दि.11) मंजुरी दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. चार नोव्हेंबरची तहकूब सभा आणि आजच्या सभेचे कामकाज झाले. त्यात भामा आसखेड धरणा प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी 10 कोटी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यास मंजुरी देण्यात आली. शहरातील मुख्य रस्ते यांत्रिकी पद्धीतीने साफसफाईसाठी 6 महिन्यांकरीता 1 कोटी 6 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्रमांक 9 मधील स्मशानभूमीचे अद्यावत पद्धतीने सुशोभिकरणासाठी 73 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील पंपाचे रेट्रोफिंटिंग करण्यासाठी 1 कोटी 20 लाख 39 हजार खर्चास मान्यता देण्यात आली.
थेरगाव येथील बिर्ला रूग्णालय येथील रस्ते कामासाठी 92 लाख खर्चास मंजुरी देण्यात आली. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील लॉण्ड्री उपकरणाचा वापर करून दवाखाना आणि रुग्णालयातील लिनन कपडे धुलाईसाठी 2 कोटी 11 लाख खर्चास मान्यता देण्यात आली.वायसीएम रूग्णालयात भुलशास्त्र विभागासाठी उपकरण खरेदीसाठी अडीच कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. चिंचवड मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत विविध कामांसाठी 93 लाख आणि आकुर्डी मैलाशुध्दीकरण केंद्राअंतर्गत तुळजाईवस्ती, विवेकनगर परिसरातील ड्रेनेज कामासाठी 33 लाख खर्चास मंजुरी देण्यात आली. शहरातील पाणी नमुने त्रयस्त संस्थेमार्फत तपासणी करुन घेण्यासाठी 28 लाख 36 हजार खर्चासही मान्यता देण्यात आली.
वायसीएमच्या फेस टू मधील बांधकामातील तळघराचा वाढीव खर्चाचा विषय तहकूब करण्यात आला. सोशल मीडिया एक्स्पर्ट नियुक्तीचा विषयाला राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने विरोध दर्शविला. तो विरोध नोंदवून त्या नियुक्तीस मंजुरी देण्यात आली. यासाठी पालिका दरमहा 70 हजार रूपये खर्च करणार आहे. सोशल मीडिया एक्स्पर्ट म्हणून नियुक्त करण्यात येणारी व्यक्ती ही भाजपची सदस्य असल्याचा आरोप शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी केला.