निर्भीडसत्ता न्यूज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास हॉकी स्टेडिमय येथील पॉलिग्रास खराब झाले आहे. ते पॉलिग्रास अखेर बदलण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका एकूण 3 कोटी 76 लाख 63 हजार खर्च करणार आहे, असे क्रीडा समितीचे सभापती तथा उपमहापौर तुषार हिंगे यांनी सांगितले.
स्टेडिमयच्या मैदानावरील पॉलिग्रास 4 ते 5 वर्षांपासून अनेक ठिकाणी फाटले आहे. पॉलिग्रासचे आयुष्यमान संपल्याने ते अनेक ठिकाणी उसवले आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत झाला आहे. फाटलेल्या पॉलिग्रासमध्ये पाय किंवा स्टिक अडकून तसेच, गुळगुळीत पृष्ठभागामुळे घसरून पडल्याने खेळाडू जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे.
पॉलिग्रास खालील काँक्रीटला अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे पॉलिग्रास एकसमांतर न राहता अनेक ठिकाणी खोलगट झाले आहे. त्यामुळे खेळाडूंच्या पायाना लचका बसण्याचे प्रकार घडत आहेत. पॉलिग्रास खाली पाणी साचत असल्याने मैदान वारंवार घाण होत आहे.
या संदर्भात हॉकी खेळाडू, संयोजक व हॉकी संघटनांनी पालिकेच्या क्रीडा विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, तात्पुरती डागडुजी करून वेळ मारून नेण्यात येत होती. तक्रारींची संख्या वाढल्याने अखेर, नवे पॉलिग्रास घालण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतला, असे हिंगे यांनी सांगितले.
पॉलिग्रास बसविण्यासाठी स्थापत्य विभागाने 4 कोटी 15 लाख खर्चाची निविदा सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केली होती. त्यात स्पोर्टीना एक्झिम, शिवनरेश स्पोर्ट्स व अॅडव्हान्सड स्पोर्टस टेक्नॉलॉजीज एलएलपी या तीन एजन्सीच्या निविदा प्राप्त ठरल्या. स्पोर्टीना एक्झिमची 9 टक्के कमी 3 कोटी 78 लाख दराची निविदा प्राप्त ठरली. त्या खर्चास स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. स्टेडियममधील जुने पॉलिग्रास काढून नवे निळ्या रंगाचे पॉलिग्रास बसविणाच्या कामाची मुदत 3 महिने आहे.
क्रीडा व स्थापत्य विभागाच्या समन्वयातून काम व्हावे : तुषार हिंगे
क्रीडाविषयक काम करताना क्रीडा विभाग, त्या-त्या खेळाचे तज्ज्ञ, अनुभवी व ऑलिपिंक खेळाडू यांच्याशी पालिकेचा स्थापत्य विभाग समन्वय साधत नसल्याने काम योग्य प्रकार होत नाही. परिणामी, खेळाच्या सरावासाठी तयार केलेले मैदाने, हॉल वापराअभावी पडून राहतात. त्यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होते, अशी तक्रार क्रीडा विभागाचे सभापती तुषार हिंगे यांनी केली आहे. त्या संदर्भात त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रारही केली आहे. हिंगे यांच्या या सुचनेकडे पालिकेच्या स्थापत्य विभाग गांभीर्याने पावले उचणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, हॉकीपटूंच्या सरावासाठी पॉलिग्रास बदलण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतला आहे. लवकरच शहरातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे पॉलिग्रास उपलब्ध होणार आहे, असे हिंगे यांनी सांगितले.