निर्भीडसत्ता न्यूज
इराणनं बुधवारी आक्रमक पवित्रा घेत इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. इराणनं या क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून अमेरिकेनंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इरबिल, अल असद आणि ताजी या लष्करी हवाई तळांवर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अमेरिकेचे ३० सैनिक मारले गेल्याचे इराणच्या माध्यमांकडून सांगण्यात आलं आहे. कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला असल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर अमेरिकेनं आखाती देशात जाणारी वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
७ जानेवारी रोजी ५.३० मिनिटांनी (ईएसटी) इराणनं इराकमधील लष्कराच्या हवाई तळांवर १२ पेक्षा अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे साहाय्यक जोनाथन हॉफमॅन यांनी दिली. ही क्षेपणास्त्र इराणकडून डागण्यात आली. अमेरिका आणि त्यांच्या सहकारी लष्कराचं तळ हे त्यांचं लक्ष्य होतं, असंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, इराणच्या ‘इस्लामिक रीव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’नं (आयआरजीसी) अल असद या हवाई तळावर १० क्षेपणास्त्र डागली असल्याची माहिती इराणी माध्यमांकडून देण्यात आली. तसंच याप्रकारचे आणखी हल्लेही करण्यात येणार असल्याचा इशारा ‘इस्लामिक रीव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’कडून देण्यात आला. याव्यतिरिक्त इराणवर हल्ल्यासाठी कोणत्याही शेजारी देशानं भूमी उपलब्ध करून दिल्यास त्या देशावरही हल्ला करण्यात येईल, असंही आयआरजीसीकडून सांगण्यात आलं आहे.