पिंपरी | निर्भीडसत्ता न्यू्ज
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महात्मा जोतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव स्थगित करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला आहे. नागरिकांनी घरी राहून या महामानवांना अभिवादन करावे, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले आहे.
जयंतीसंदर्भात मंगळवारी (दि.7) महापालिकेत बैठक झाली. या वेळी महापौरांनी हा निर्णय घेतला. बैठकीस पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समित अध्यक्ष संतोष लोंढे, आयुक्त श्रावण हर्डीकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्य सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, देवेंद्र तायडे, बाळासाहेब रोकडे, दशरथ ठाणांबीर, धम्मराज साळवे, संतोष निसर्गंध, शिवशंकर उबाळे, गिरीश वाघमारे, अजय झुंबरे, संतोष जोगदंड, मनोज गरबडे, बापुसाहेब वाघमारे, प्रदोष जाधव आदी उपस्थित होते.
महापालिकेने दरवर्षीप्रमाणे 11 ते 14 एप्रिल या दरम्यान महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि लॉकडाऊनमुळे तो स्थगित करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. योग्य वेळ निश्चित करुन तो आगामी काळात आयोजित केला जाईल, असे महापौर ढोरे यांनी पदाधिकार्यांना सांगितले.
जयंतीनिमित्त फुले व आंबेडकर पुतळा परिसरात सुशोभिकरण करण्यात यावे, अशी सूचना पदाधिकार्यांनी केली. त्यांची पुर्तता करण्याचे आदेश महापौरांनी संबंधित विभागास दिले.