पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधीत रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवार (दि.17) आणखी 4 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील कोरोना रूग्णांची संख्या 52 झाली आहे. शुक्रवारी 19, 31 व 33 वर्षीय पुरूष आणि 42 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे एनआयव्हीच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. ते सर्व जण भोसरीतील पीएमटी चौक व दिघीतील मुळानगर परिसरात राहवयास आहेत. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात विषाणू प्रादुर्भाव असल्याचे स्पष्ट होत आहे.
शहरात सर्वांत प्रथम कोरोनाचे 3 रूग्ण 11 मार्चला सापडले होते. त्यात दिवसेंदिवस भर पडत जाऊन महिन्याभरात ही संख्या 52 वर पोहचली आहे. तसेच, दररोज 70 ते 80 च्या आसपास कोरोना संशयित रूग्णांची भर पडत आहे. आतापर्यंत एकूण 1 हजार 252 संशयित रूग्णंचे घशातील द्रव्याचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडून तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी केवळ 1 हजार 111 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर, तब्बल 2 हजार 431 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने औद्योगिकनगरीची चिंता वाढली आहे.
कोरोनाबाधीत एकूण रूग्णात 32 पुरूष तर, 16 महिला आहेत. शहरातील 4 जण पुण्यातील रूग्णालयात उपचार घेत आहेत. भोसरी व खराळवाडी-गांधीनगर परिसरातील कोरोनाचे सर्वांधिक रूग्ण आढळून आले आहेत. थेरगाव, दिघी, दापोडी, कासारवाडी, चिखली घरकुल या परिसरात सक्रिय कोरोनाचे रूग्ण अधिक संख्येने आहेत. त्यामुळे हे 7 परिसर हॉटस्पॉट झोन घोषित करून सील करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी रस्ते बंद करून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
एकूण 13 रूग्ण झाले बरे
शहरातील कोरोनाचे बाधीत एकूण 13 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ही उद्योगनगरीसाठी दिलासादायक बाब आहे. 34 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थित आहे. थेरगावच्या एका सुरक्षारक्षकाचा कोरोनामुळे गेल्या रविवारी मृत्यू झाला आहे. तो कोरोनाचा शहरातील एकमेव बळी आहे.