- व्हिडीओ कॉन्फरन्सला केवळ 51 नगरसेवकांचा सहभाग… 82 नगरसेवकांचे महामारीकडे दुर्लक्ष
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
कोरोना विषाणुंचा संसर्ग टाळण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. त्या संदर्भात केलेल्या विविध कामकाजाची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नगरसेवकांना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दिली. मात्र, या संवादामध्ये केवळ 51 नगरसेवकांनी सहभाग घेतला. तर, तब्बल 82 नगरसेवकांनी या आपत्कालीन स्थितीतील कोरोना महामारीकडे दुर्लक्ष केल्याचे धक्कादायक चित्र आहे. सर्व 133 नगरसेवकांना माहिती देण्यासाठी ‘हॅग आउट मिट’ या व्हिडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली. या वेळी आयुक्त हर्डीकर, महापौर उषा ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी पक्षनेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते.
आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले की, बेघर, बेरोजगार, परप्रांतीय व इतर नागरीकांची उपासमार होऊ नये, यासाठी भोजन व तात्पुरता निवारा केंद्र असा सुविधा देण्यात येत आहेत. दररोज 52 हजार नागरिकांना अन्न दिले जात आहे.
वायसीएम रूग्णालय कोरोनासाठी निश्चित केले आहे. भोसरी रूग्णालय येथेही कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. जिजामाता रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. रूग्नांची क्वारंटाइनची व्यवस्था मोशीतील सामाजिक न्याय विभागाचे वसतीगृहात करण्यात आली आहे.
पालिकेतर्फे सर्व रूग्णालय व दवाखान्यात मोफत फ्ल्यू ओपीडी तसेच, मोबाईल क्लिनीक सुरू करण्यात आले आहेत. सर्व कोरोना पॉझिटिव्ह रूग्र व त्यांचे हाय रिस्क कॉन्टक्टमधील कंन्टेनमेंट झोनचे ‘जीआयएस मॅपींग’ केले जात आहे. नागरीकांना लॉकडॉऊन दरम्यान भेडसावणार्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘स्मार्ट सारथी’ मोबाईल अॅप तयार करण्यात आला. कोरोना संबंधित गोष्टीचे संनियंत्रणासाठी वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे.
वैद्यकीय व्यवसायिक आणि विविध खासगी पॅथालॉजी व्यवसायिकांचे व्हॉटसअप ग्रुप तयार करण्यात आले असून, सोशल मीडियाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. घरोघरी सर्वेक्षणामध्ये माहितीपत्र वाटले जात आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.