पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
कोवीड-19 या विषाणुमुळे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योग,व्यवसाय बंद आहेत. अशा परिस्थितीत शहरातील इंग्रजी माध्यमातील खाजगी व विनाअनुदानित अनेक शाळांकडून ऑनलाईन क्लासेसचा बहाणा करून शाळा सुरू झाल्याचे सांगून पालकांना संपूर्ण फीची रक्कम भरायला भाग पाडत आहेत. या मुजोर शाळांवर कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबत संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना निवेदन देण्यात आले. लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांपासून संपूर्ण आर्थिक व्यवहार आणि उपजिविकेची साधने बंद आहेत. सर्व व्यवहार ठप्प असल्याने सर्व नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे.
अशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरातील इंग्रजी माध्यमातील खाजगी व विनाअनुदानित अनेक शाळांकडून ऑनलाईन क्लासेसचा बहाणा करून शाळा सुरू झाल्याचे सांगून पालकांना संपूर्ण फीची रक्कम भरायला भाग पाडतं आहेत. पालकांकडून अशा प्रकारच्या अनेक तक्रारी संभाजी ब्रिगेडकडे आलेल्या आहेत. राज्य सरकारने 8 मे रोजी राज्यातील शालेय शुल्क जमा करण्याची सक्ती न करण्याचे परिपत्रक काढले आहे.
तरीसुद्धा राज्य सरकारच्या परिपत्रकाला न जुमाणणाऱ्या मुजोर शाळा चालक ( मुख्याध्यापक व संस्था चालक) यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्याच्या सुचना शासनामार्फत पोलीस प्रशासनास द्याव्यात; अन्यथा अशा शाळा व संस्थाचालकांना संभाजी ब्रिगेड स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे, विशाल तुळवे, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते व प्रमोद गोतारणे यांनी निवेदनात दिला आहे.