पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन शहरांसह पूर्ण जिल्ह्यातील कंटेनमेंट झोनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यानुसार १३ जुलैपासून १५ दिवस पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर बंद राहणार आहे.
सुमारे ७२ दिवसांच्या लॉकडाऊननंतर राज्य सरकारनं जूनच्या सुरुवातीपासून अनलॉकला सुरुवात केली होती. तेव्हापासून सार्वजनिक वाहतूक वगळता सर्व व्यवहार टप्प्याटप्प्यानं पूर्ववत केले जात आहेत. मात्र, लॉकडाऊन जसजसे शिथिल होत आहे, तसतसे करोनाचे रुग्ण वाढत असल्याचं निदर्शनास येत आहे. पुणे जिल्ह्यातही रुग्ण वाढीचं प्रमाण मोठं आहे. नागरिकांची बेफिकीरी देखील यास कारणीभूत ठरली आहे. नागरिकांनी शिस्त न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन घेण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याआधी वेळोवेळी दिला होता. त्यानंतरही लोकांचं विनाकारण फिरणं थांबलं नाही. त्यातून संसर्गाचा धोका वाढला. तो आणखी वाढू नये म्हणून अखेर सोमवारी (दि. १३) मध्यरात्रीपासून पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईनंतर सर्वाधिक करोनाबाधित जिल्हा म्हणून महाराष्ट्रात पुण्याचा क्रमांक आहे. सुरुवातीच्या काळात करोनाची लागण पुणे शहर व पिंपरी-चिंचवड पुरता मर्यादित होती. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ग्रामीण भागातही लागण सुरू झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३५ हजारच्या उंबरठ्यावर आहे. आतापर्यंत ३४ हजार ५८२ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर, ९७९ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील रुग्णसंख्येने १५ हजारचा टप्पा ओलांडला आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णसंख्येने ६ हजारांचा टप्पा पार केला आहे.