पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित रूग्ण वाढत असल्याने त्यांच्यावर उपचारासाठी रूग्णालय व कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून, त्यात आवश्यकतेनुसार आणखी वाढ केली जाणार आहे. या ठिकाणी मानधनावर नियुक्त केलेल्या डॉक्टरांच्या मानधनात 20 हजार रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यास स्थायी समितीने बुधवारी (दि.23) मंजुरी दिली आहे.
पालिकेचे वायसीएम, भोसरी व नवीन जिजामाता रूग्णालय हे कोरोना उपचार रूग्णालय आहेत. तर, आकुर्डीतील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, शाहूनगरचे रिजनल टेलिकॉम सेंटर, किवळचे सिम्बॉयसिस महाविद्यालय, आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, मोशीतील आदिवासी विभागाचे वसतीगृह, संत तुकारामनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय, वाकड येथील बालाजी महाविद्यालय, इंदिरा महाविद्यालय, म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुल वसतीगृह, मोशीचे सामाजिक न्याय विभागाचे वसतीगृह, म्हाळुंगे-चाकण येथील म्हाडा वसाहत येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.पालिकेच्या तालेरा, भोसरी, आकुर्डी, सांगवी, यमुनानगर, थेरगाव, जिजामाता रूग्णालयात अन्य रूग्णांवर उपचार केले जात आहेत. ही रूग्णालये व सेंटर चालविण्यासाठी पालिकेस मोठ्या संख्येने वैद्यकीय अधिकारी व पॅरामेडिकल कर्मचारी गरज असून, त्यांची मानधनावर 6 महिने कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, आवश्यकतेनुसार आणखी मनुष्यबळ घेतले जाणार आहे. राज्य शासनाच्या 29 मे 2020 च्या निर्णयानुसार शासनाच्या सेवेतील कंत्राटी तसेच, बंधपत्रित वैद्यकीय अधिकार्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार पालिकेने मानधनावर नियुक्त केलेल्या डॉक्टरांचे मानधन 20 हजार रूपयांने वाढविले जाणार आहे.
एमबीबीएस व पदव्युत्तर पदवी आणि एमबीबीएस व पदव्युत्तर पदविकाधारक डॉक्टरांना 65 हजारांऐवजी 85 हजार रूपये वेतन दिले जाणार आहे. तर, एमबीबीएस डॉक्टरांना 55 हजारांऐवजी 75 हजार रूपये वेतन असणार आहे. या प्रशासनाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मानधनावरील डॉक्टरांना 20 हजारांची वेतनवाढ मिळणार आहे.