पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
कोरोना उपाययोजनेसह पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकासकामांसाठी सुमारे 100 कोटी रूपये खर्चास स्थायी समितीने बुधवारी (दि.7) मंजुरी दिली. शिवणे व गहुंजे येथे कोल्हापूर पद्धतीने बंधारा बांधण्यासाठी नाशिकच्या संकल्पचित्र संघटनेचा सल्ला घेण्यासाठी शुल्क अदा करण्यास मान्यता देण्यात आली.व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बुधवारी (दि.7) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे होते. तीस सप्टेंबर व 7 ऑक्टोबर असा दोन सभा आज झाल्या. तीस सप्टेंबरच्या सभेत एकूण 18 कोटी 55 लाख खर्चाच्या 55 विषयांना मंजुरी देण्यात आले. तर, 3 कोटी 5 लाखांचा निधी वर्गीकरणास मंजुरी देण्यात आली. तर, आजच्या सभेत एकूण 55 विषयांच्या 82 कोटीं खर्चास मंजुरी देण्यात आली.शिवणे व गंहुजे येथे कोल्हापूर पद्धतीने बंधारा बांधण्यासाठी नाशिकच्या मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेचा सल्ला घेण्यासाठी 36 लाख 5 हजार खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच, पवना धरणातील पाणी आरक्षणापोटी 37 लाख 44 हजार रूपये अनामत रक्कम अदा करण्यास मान्यता देण्यात आली.महामेट्रोला वल्लभनगर व पालिका भवनातील जागा देण्यास मंजुरी देण्यात आली. निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील कंत्राटी कर्मचार्यांना किमान वेतन कायद्यानुसार वाढीव वेतन देण्यासाठी एकूण 92 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात यांत्रिक पद्धतीने मलनिस्सारण नलिका साफसफाईच्या कामास मुदतवाढ देऊन 1 कोटी 29 लाख खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच, याच कामासाठी ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयासाठी 1 कोटी 29 लाख आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयासाठी 1 कोटी 29 लाख खर्चास मान्यता देण्यात आली.सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील टप्पा क्रमांक एकच्या शुद्ध पाण्याच्या टाकीला नवीन छत बसविण्यासाठी 3 कोटी 60 लाख 63 हजार खर्चास मान्यता देण्यात आली. शहर कचरामुक्त जाहीर करून फाईव्ह स्टार नामांकन घोषित करण्याच्या कार्यवाहीस मंजुरी देण्यात आली. पालिकेच्या विविध विभागातील संगणक दुरूस्तीसाठी 1 कोटी 18 लाख 28 हजार खर्चास मान्यता देण्यता आली. क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील दुभाजक सुशोभीकरण व देखभाल कामास मान्यता देण्यात आली.