२८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘माहिती अधिकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. नागरिकांना शासन दरबारी नेमके काय चाललंय, हे समजून घेण्याचा अधिकार या माहिती अधिकारान्वये मिळालेला आहे. त्याचे महत्त्व सकलजणांना पटावे म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीनेही २८ सप्टेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन’ व्यापक स्वरूपात साजरा करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात दिपक खैरनार यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘माहितीचा अधिकार अधिनियम-२००५’ हा कायदा देशभरात २००५ या वर्षापासून लागू झाला. तेव्हापासून देशातील व राज्यातील भ्रष्टाचाराला मोठया प्रमाणावर अंकुश बसत आहे. शासन यंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता यावी, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन व्हावे, प्रशासकीय कार्यपद्धती, नियम व इतर शासकीय कामांमध्ये गैरव्यवहारास वाव राहू नये, शासकीय कार्यपद्धतीबद्दल सामान्य जनतेला साशंकता वाटू नये व त्यांची कामे विनाविलंब, सहजगत्या व्हावीत यासाठी ‘माहितीचा अधिकार’ या कायद्याची निर्मिती झाली.
प्रशासनाने वेळोवेळी उचललेल्या सकारात्मक पावलांमुळे अल्पावधीतच हा कायदा देशात व राज्यात लक्षणीय स्वरुपात लोकाभिमुख झाला आहे. तरीही या कायद्याचा प्रचार व प्रसार व्यापक स्वरूपात होण्याची नितांत गरज आहे. या कायदयाच्या व्यापक प्रसिध्दीसाठी व प्रभावी अंमलबजावणी करीता शासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात २८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने यापूर्वीही आदेश दिलेले आहेत. दरवर्षी शासकीय पातळीवर आदेश निघतो. पण माहिती अधिकार दिन केवळ कागदोपत्री साजरा होत असून, त्याची जनजागृती करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे.
या दिवशी माहितीचा अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतुदी आणि कार्यपध्दती, विविध दृकश्राव्य माध्यमातून व्यापक प्रसिध्दी देऊन व विविध उपक्रम राबवून त्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्यात याव्यात. यादिवशी स्पर्धा, निबंध, वकृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा तसेच व्याख्यानमाला “माहितीचा अधिकार” या विषयावर उपक्रम घेऊन सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये उपक्रम आयोजित करावेत. तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते व इच्छुक गटांकरिता भित्तीपत्र, निबंध स्पर्धा, व्याख्यानमाला आयोजित करून “माहिती अधिकार दिवस” म्हणून साजरा करून माहितीच्या अधिकाराबाबत समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती, प्रचार-प्रसार करून नागरिकांपर्यंत पोचविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने शासनाच्या निर्देशानुसार शहरात ‘आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन’ साजरा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.