पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
अर्धवट माहितीसह मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करणार्या अधिकार्यांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी झटका दिला. त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर केलेल्या 21 पैकी फक्त 13 प्रस्ताव मंजूर केले. तर, उर्वरित 8 प्रस्ताव फेटाळले. सविस्तर माहितीसह ते प्रस्ताव नव्याने सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठ्या प्रमाणात होणारा राजकीय हस्तक्षेप व अधिकार्यांच्या चुकीच्या कार्यपध्दतीमुळे प्रशासकीय बेशिस्तपणा वाढला आहे. मात्र, आयुक्त सिंह यांनी रूजू झाल्यानंतर वेळोवेळी अधिकार्यांच्या बेशिस्तपणावर बोट ठेवले आहे. त्यांनी स्पष्ट अभिप्राय व स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. तर, स्मार्ट सिटीच्या कामांवरून व मुदतवाढीच्या प्रस्तावांवरून आयुक्तांनी अधिकार्यांना फटकारले होते.
झालेल्या प्रशासकांच्या बैठकीत पुन्हा आयुक्तांनी अधिकार्यांच्या कार्यपध्दतीवर बोट ठेवले. स्थायी समितीच्या मान्यतेसाठी एकूण 21 प्रस्ताव विविध विभागांकडून मान्यतेसाठी सादर करण्यात आले होते. त्यापैकी केवळ 13 आवश्यक व पूर्ण माहितीसह असलेल्या प्रस्तावांना सिंह यांनी मान्यता दिली. मात्र, इतर 8 प्रस्तावांना आयुक्तांनी मान्यता दिली नाही. त्यांनी अधिकार्यांना सविस्तर माहितीसह प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकार्यांनी आपल्या विभागामार्फत सादर होणार्या प्रस्ताव किंवा कामाबाबत निविदा प्रक्रिया, मुदतवाढ, खर्चाचा तपशील व इतर आवश्यक माहिती नमूद करण्यास बजावले आहे. प्रस्ताव वाचल्यानंतर सर्व शंकाचे निरसन व्हायला हवे, असे प्रस्ताव असावेत, असे त्यांनी सूचित केले आहे. त्यासाठी एक निश्चित पद्धत ठरविण्याचे आदेश त्यांनी नगररचना विभागास दिले आहे.