पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणीसाठी सर्व पदाधिकार्यांसह नगरसेवकांना टार्गेट दिले आहे. नगरसेवकांनी 1 ते 2 हजार सदस्यांची आणि किमान 300 सक्रियाशील सदस्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. टार्गेट पूर्ण न केल्यास महापालिका निवडणुकीत तिकीट मिळणार नाही, असा इशारा देत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निष्क्रीय माजी नगरसेवकांची हजेरी घेतली.
प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पक्षाच्या सभासद नोंदणी मोहिमेचा आढावा काळेवाडी फाटा येथील एका हॉटेलमध्ये घेतला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, माजी नगरसेवक व विविध आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक पदाधिकार्यांकडून नोंदणीचा आढावा घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी खरमरीत शब्दात माजी नगरसेवक व पदाधिकार्यांचा समाचार घेतला. सभासद नोंदणीचे टार्गेट सर्वांनी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. गेल्या 5 महिन्यांपासून ही मोहीम सुरू असून, त्याला पाहिजे तसा प्रतिसाद नाही. अधिक संख्येने सभासद झाल्याशिवाय विभागाध्यक्षांची निवडणूक कशी होणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
माजी नगरसेवकांची प्रत्यक्ष हजेरी घेत 36 पैकी केवळ 18 नगरसेवक उपस्थित असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांची यादी मला पाठवा, असे त्यांनी शहराध्यक्षांना सूचित केले. राज्यातील सत्ता गेली, ती कधीही येऊ शकते. त्यामुळे शांत बसू नका, असा सल्ला त्यांनी दिला. वारंवार सूचना देऊनही निष्क्रीय असलेल्या पदाधिकार्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला.
मेळाव्यात सर्वांधिक सभासद नोंदणी करणार्या दहा पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. शहराध्यक्ष गव्हाणे म्हणाले की, शहराला दिलेले सदस्य नोंदणीचे टार्गेट पूर्ण केले जाईल. प्रत्येक सेलचा दर महिन्यास आढावा बैठक घेतली जात असून, त्यासाठी स्वतंत्र निरीक्षक नेमला आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सर्व तयारी झाली आहे. पालिकेत 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.