पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
काळेवाडी येथील खुशी मुल्ला हिची 19 वर्षांखालील महाराष्ट्र महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. त्याबद्दल पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या हस्ते तिचा सत्कार करून तिला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी क्रीडाधिकारी अनिता केदारी, पीसीएमसी-व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक शादाब शेख, खुशीचे वडील नवीलाल मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते संजय गायके, प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते. खुशी ही गेल्या 10 वर्षांपासून महापालिकेच्या थेरगाव येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीत सराव करते. तिने 16 वर्षाखालील, 19 वर्षाखालील, 23 वर्षाखालील गटात महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तिला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व ज्येष्ठ प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.
खुशीचे वडील नवीलाल मुल्ला म्हणाले की, खुशीला लहाणपणापासूनच क्रिकेटची आवड होती. मोठा भाऊ अमन मुल्ला याने 19 वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याच्यापासूनच खुशीने प्रेरणा घेतली. दिलीप वेंगसरकर यांनी वैयक्तिक लक्ष देऊन वेळोवेळी खुशीला मार्गदर्शनही केले. त्यामुळेच ती गौरवास्पद कामगिरी करू शकली.