पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
संत गाडगेबाबा हे भजन व कीर्तनाच्या माध्यमातून तसेच, वैज्ञानिक दृष्टीकोनातून समाजातील अंधश्रद्धा निर्मुलनासाठी काम करणारे थोर समाजसुधारक होते. त्यांनी अज्ञान, अस्वच्छता व अनिष्ठ रूढींना आळा घालण्यासाठी केलेले कार्य महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त उल्हास जगताप यांनी केले.
महापालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिका भवनात त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसेवक बन्सी पारडे, सामाजिक कार्यकर्ते नरेश कदम, विशाल जाधव, गजानन गवळी, संतोष भालेकर, सुनिल अभंग, संतोष जोगदंड, अरूण तळेकर, रामेश्वर गायकवाड, कुमार दळवी, किरण लोंढे, प्रशांत दळवी, युवराज दाखले, समीर शिंदे आदी उपस्थित होते.
अमरावती जिल्ह्यात जन्म झालेल्या संत गाडगेबाबा यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. लोकांनी दिलेल्या देणगीतून त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, नद्यांचे घाट तसेच विद्यालये सुरू केली आणि लोकसेवेचे व्रत आयुष्यभर जपले. त्यांच्या नावाने सर्वत्र स्वच्छता अभियान राबविले जाते. प्रफुल्ल पुराणिक यांनी सुत्रसंचालन केले.