निर्भीड न्यूज –
- आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले प्रकाशन
पिंपळेगुरव येथील शकिल शेख (होळवाला) यांनी पंढरीच्या विठ्ठलावर गाणी रचली आहेत. मुस्लिम असूनही त्यांनी विठ्ठलावर भक्तीभावाने गाणी लिहून बंधूभाव जपला आहे. त्यांनी लिहिलेली गाण्यांची “पंढरीचा राजा विठुहरी माझा” या नावाने सीडी बनविण्यात आली आहे. या सीडीचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ९) प्रकाशन करण्यात आले.
शकिल शेख हे पिंपळेगुरवमध्ये राहतात. ते विठ्ठल भक्त आहेत. त्यातून त्यांनी विठ्ठलाची गाणी तयार केली आहेत. त्यासाठी त्यांच्या पत्नी मिनाज शेख (होळवाला) यांचीही त्यांना साथ लाभली. गाणी तयार करण्यासाठी मिनाज शेख यांनी आपल्या पतीली मदत केली. त्यामुळेच विठ्ठलावर गाणी रचता आल्याचे मिनाज शेख यांनी “पीसीबी”शी बोलताना सांगितले.
मिनाज शेख यांनी विठ्ठलावर तयार केलेल्या गाण्यांची सीडी बनविण्यात आली आहे. “पंढरीचा राजा विठुहरी माझा” असे नाव असलेल्या या सीडीचे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते शुक्रवारी प्रकाशन करण्यात आले. आमदार जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील संपर्क कार्यालयात प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपचे शहर सरटिणीस सारंग कामतेकर, संदीप कस्पटे, गिरीश जाचक, अनिल कांबळे आदी उपस्थित होते. मुस्लिम असूनही वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलावर गाणी तयार करून मिनाज शेख यांनी एक आदर्श निर्माण केल्याचे गौरवौद्गार आमदार जगताप यांनी काढले.
“पंढरीचा राजा विठुहरी माझा” या सीडीचे निर्मिती व दिग्दर्शन शकिल शेख (होळवाला) यांनी स्वतः केले आहे. तसेच यातील सर्व गाणी त्यांनी स्वतः लिहीली आहेत. गाण्यांना संगीत सुद्धा त्यांनीच दिले आहे. शकिल शेख यांनी लिहिलेली गाणी विजय वाघमारे, हिम्मत शिंदे, अनिकेत हुंबरे आणि हिना पठाण या गीतकारांनी गायली आहेत.