निर्भीड न्यूज –
जलसंपदा विभाग, नीर फाउंडेशन, जैन इरिगेशन सिस्टीम लि. आणि यंग इन्स्पीरेशन नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 10 एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 खेडी गावानजिकच्या दूरदर्शन केंद्राजवळील सात एकर मैदानावर विश्वविक्रमी रांगोळी काढण्यात येणार असून, जलबचतीबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती नीर फाउंडेशनचे अध्यक्ष सागर महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. जैन इरिगेशनचे किशोर कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
सकाळी सात ते नऊ यावेळेत दीड हजार स्वयंसेवकांच्या मदतीने ही विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी 63 टन रांगोळी व आठ रंगाचा वापर करण्यात येणार आहे. त्यानंतर जळगावकरांना सामूहिक जलप्रतिज्ञा देण्यात येईल. या रांगोळीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड; तसेच लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंद होणार असून, त्याबाबतची मान्यता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महारांगोळी साकारण्यासाठी अभिव्यक्ती संस्कारच्या मंजुषा पात्रीकर, श्रीराम गृपच्या कुमुदिनी नारखेडे, रवी गुजर, संजय पाटील, जय कुलकर्णी, चित्रकार सचिन मुसळे, किरण बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली बांभोरी कॉलेजचे ऋषिकेश पवार, रायसोनी कॉलेजचे किरण कावडे, गुलाबराव देवकर अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या प्रतिभा चौधरी, मू. जे. महाविद्यालयाचे वैभव नेवे, गोदावरी महाविद्यालयाचे मितेश गुजर, रायसोनी ग्रुपचे नीरज कलंत्री आदी प्रामुख्याने नियोजन करीत आहेत.
रांगोळी रेखाटल्यानंतर जलजागृतीसाठी होण्यार्या कार्यक्रमास पालकमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, खासदार रक्षा खडसे, आमदार राजू भोळे, पोलिस अधीक्षक डॉ. जालींदर सुपेकर, महापालिका आयुक्त संजय कापडणीस, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत.