निर्भीड न्यूज –
सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन रविवार, दि. 10 एप्रिल रोजी उत्साहात झाला. संस्थेच्या काळेवाडी येथील नुतनीकरण केलेल्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले; तसेच या वेळी स्नेहमेळावाही घेण्यात आला.
इंद्रायणी सहकारी बँकेचे चेअरमन अॅड. एस. बी. चांडक, सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बांधकाम व्यावसायिक सुरेश शिरुडे, नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या पिंपरी-चिंचवड महानगर शाखेचे अध्यक्ष विजय शिनकर, सागर तापकीर आदी या वेळी उपस्थित होते.
सुरेश शिरुडे या वेळी म्हणाले की, कोणतही संस्था चालविताना सांघिक कार्य महत्वाचे आहे. ‘टीम वर्क’ नसल्यास संस्थेची विश्वासार्हता धोक्यात येते. व्यवहार पारदर्शक होत नाहीत. आर्थिक संस्था चालविताना ही मोठी कसरत आहे. त्यामुळे सर्वांनीच पुढे येऊन सप्तश्रृंगी पतसंस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. ठेवीदारांचे हित जपले पाहिजे. थकबाकीदार वाढू नयेत म्हणून कर्जदारांच्या अडचणी सोडविण्यावर भर दिला पाहिजे. जेणेकरून संस्थेबाबत विश्वासार्हता वाढीस लागेल.
अॅड. एस. बी. चांडक म्हणाले की, संस्थेच्या वाटचालीत चढ-उतार येत असतात. आर्थिक संस्था चालविताना कायद्याचे काटेकोर पालन करावे लागते. कर्ज वसुली करताना बँका आणि पतसंस्थांना कटु प्रसंगांना सामोरे जावे लागते. असे असले, तरी नियमावली आणि भावनिक गुंतागुंत यांचा ताळमेळ असावा लागतो. पारदर्शक व्यवहार आणि विश्वासार्हता याच्या जोरावरच हे शक्य आहे.
नगरसेवक प्रमोद ताम्हणकर यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. प्रा. उदय पाटकर यांनी दिलखुलास आणि खुमासदार सूत्रसंचालन केले. पतसंस्थेचे सेक्रेटरी मिलिंद पाटील यांनी आभार मानले. प्रशांत तरवटे आणि कर्मचा-यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडळ ट्रस्टचा ‘सूर-संध्या’ हा भक्तीगीतांचा कार्यक्रमही यावेळी सादर करण्यात आला. भटुलाला बागुल, गणेश खैरनार यांनी गायन केले. फार्मा क्षेत्र प्रदी लांडे यांनी हार्मोनियम, सुधीर पकडे यांनी तबला आणि अनिल खवले यांनी टाळसंगत केली. गणेशवंदना, सरस्वतीवंदना, गुरुवंदनेसह सादर करण्यात आलेल्या भजनांसह अन्य गीत आणि समारोपातील ‘भैरवी’मुळे उपस्थित भक्तीरसात चिंब झाले.