निर्भीड न्यूज –
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी अर्थात 125 व्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक चौकात जनसागर लोटला आहे. दुपारी रखरखत्या उन्हातही भीमसैनिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे. दुपारी चारनंतर या चौकातील गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, या चौकातील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक चौकात शहरासह परिसरातील नागरिकांची गर्दी होत आहे. शासकीय आणि औद्योगिक सुटी जोडून आल्याने शासकीय कर्मचारी आणि कामगारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली आहे. सायंकाळपर्यंत हजारो नागरिकांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.
काही संस्था आणि संघटनांच्या वतीने निळे फेटे आणि टोप्यांचे वाटप करण्यात आले. तसेच अनेक जण पांढरा पोषाख, निळा रुमाल, निळा ध्वज घेऊन चौकात दाखल होत आहेत. त्यामुळे हा चौक नीलमय झाला आहे. निळा सागर लोटल्याचे चित्र त्यामुळे येथे आहे.
बाबासाहेबांचा सातत्याने जयघोष करण्यात येत आहे. या जयघोषामुळे चौक दणाणून गेला आहे.