निर्भीड न्यूज –
खान्देशी माणसांना पुढे जाण्यासाठी खान्देशीबांधवांनीच प्रोत्साहन दिले पाहिजे; तसेच अहिराणीला राजभाषा म्हणून मान्यता मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपले संघटन झाले पाहिजे, असे मत टाटा मोटर्स कंपनीचे निवृत्त अधिकारी, अहिराणी साहित्यिक बापूसाहेब पिंगळे यांनी व्यक्त केले.
माय, गाय, भाषा पुरस्कृत मायबोली विकास मंचतर्फे रविवार, दि. 17 एप्रिल रोजी चिंचवड येथे खान्देश स्नेह मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बापूसाहेब पिंगळे होते. विविध पुरस्कारांचे वितरण या वेळी पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
सप्तश्रृंगी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सुरेश शिरुडे या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मनसेचे गटनेता अनंत को-हाळे, पिंपरी-चिंचवड येथील उद्योजक बाळासाहेब गवारे, भाजपाच्या कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नामदेव ढाके, अहिराणी कस्तुरी परिवारच्या विजया मानमोडे, पिंपरी-चिंचवड येथील उद्योजक डी. टी. पाटील, अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेचे पिंपरी-चिंचवड महानगर शाखाध्यक्ष विजय शिनकर, उद्योजक रजनिश पाटील, उद्योजक पी. टी. चौधरी, सुवर्णकार समाजाचे दीपक सोनार, उद्योजक रवींद्र कोल्हे, देवयानी पाटील, सेवा विकास सहकारी बँकेचे संचालक नरेंद्र ब्राह्मणकर, शिवसनेनेच सचिन सानप आदी या वेळी उपस्थित होते.
मंचतर्फे या वेळी विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रशांत भीमराव पाटील यांना मायबोली भूषण पुरस्काराने या वेळी सन्मानित करण्यात आले. प्रशांत पाटील यांचे मुळगाव धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील खलाणे आहे. पिंपरी-चिंचवड येथे प्रचिती पब्लिसिटी या नावाने त्यांची जाहिरात कंपनी आहे. ‘खान्देश वेध’ या साप्ताहिकाचे ते मालक आणि संपादक आहेत. यासह एकविरा फाउंडेशनअंतर्गत प्रशांत पाटील यांची साक्री येथे प्रचिती इंग्लिश मीडियम स्कूल आहे.
अशोक यादव यांना मायबोली गोशाळा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुस्तीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी ठरलेला पै. विजय चौधरी, मोशी केसरी पै. पंकज हरपुडे, महाराष्ट्र चॅम्पियन पै. साईनाथ रानवडे यांचाही या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.
बडाबाई केरु ढमाले, अनुसया नामदेव पिंगळे, इंदिरा मनोहर कुलकर्णी गिरीजाबाई धोंडू चौधरी, रेशमा तानकू बोरसे, यमुना दगडू लोहार, शकुंतला बाळासाहेब घोरपडे, मुक्ता आनंदा सैंदाणे, लीला भिका ब्राह्मणकर, शकुंतला गोपीचंद पाटील, सुलोचना प्रल्हाद झोपे, यमुना लोटन खैरनार, शकुंतला पांडुंरंग जाधव, रुक्मिणी भीमराव जाधव यांचा आदर्श माता म्हणून या वेळी सन्मान करण्यात आला.
बापूसाहेब पिंगळे या वेळी म्हणाले की, आई आपल्या मुलांना प्रेम देते. त्याचप्रमाणे आपल्या वडिलांनाही वाटते की, आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा मोठे व्हावे. आपण सर्वांनी आपल्या माणसांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. पुणे आणि पिंपरी-चिंवचड शहरात खान्देशीबांधवांसाठी विविध उपक्रम राबविले पाहिजेत. येथे खान्देशी सांस्कृतिक भवन उभारणे गरजेचे आहे.
सुरेश शिरुडे या वेळी म्हणाले की, आईने केलेला त्याग आणि परिश्रम याची दखल घेत आईचा सत्कार करण्यात आला. मातांचा येथे झालेला हा सत्कार म्हणजे हा आपल्या सर्वांचा सन्मान आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये होणार आहे. या निवडणुकीत 10 खान्देशी उमेदवार निवडून यावेत म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी खान्देशीबांधवांचे संघटन महत्त्वाचे आहे. खान्देशी बांधवांनी सामाजिक उपक्रमांकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक केला पाहिजे आणि अशा उपक्रमांमध्ये सहभागी झाले पाहिजे.
नामदेव ढाके म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे दोन लाख खान्देशी बांधव वास्तव्यास आहेत. कोणालाही उपद्रव होणार नाही, अशा पध्दतीने या खान्देशी बांधवोचे काम सुरू आहे. असे असले, तरी त्यांचे संघटन होणे आवश्यक आहे. संघटन झाल्यास खान्देशीबांधवांकडे पाहण्याचा सगळ्यांचा दृष्टीकोन सकारात्मक होईल.
विजया मानमोडे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. मंचचे अध्यक्ष दिलीप चौधरी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. उदय पाटकर यांनी खुमासदार सूत्रसंचालन केले.
मायबोली विकास मंचचे अध्यक्ष दिलीप चौधरी, दिलीप पाटील, मधुकर चौधरी, प्रा. उदय पाटकर, गोविंद चौधरी, महेंद्र पाटील, अनिल सोनार, किरण चौधरी, कैलास मोरे, टी. एस. वाघ, गणेश राजपूत, अमोल आहेर, किरण बाविस्कर, अजय जाधव, छोटू कोके यांनी संयोजन केले.